आता क्रिकेट दिवाळी!; भारत-न्यूझीलंड मालिकेचा पहिला बार आज

शैलेश नागवेकर
Sunday, 22 October 2017

भारत-न्यूझीलंड 
आज पहिला सामना 
वेळ : दुपारी 1.30 पासून 
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस 

मुंबई : ऑस्ट्रेलियाला शरण आणून दसऱ्याचा उत्साह द्विगुणित करणारा भारतीय संघ आता चौकार-षटकारांचे फटाके फोडून मैदानावर दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेचा पहिला बार उद्या (ता. 22) वानखेडे स्टेडियमवर उडणार आहे. या मालिकेतून भारताला पुन्हा एकदा एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याचे लक्ष्य गाठायचे आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकून भारताने एकदिवसीय क्रमवारीत पहिले स्थान मिळवले होते; परंतु दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला चितपट केल्यामुळे दोघांचे प्रत्येकी 120 गुण झाले आहेत; परंतु डेसिमल गुणांकनामुळे आफ्रिका पुढे आहे. त्यामुळे विराट सेनेचे लक्ष्य केवळ न्यूझीलंड नसून तर पुन्हा पहिला क्रमांक मिळवण्याचेही असेल. 

गतवर्षी दिवाळीच्या काळात न्यूझीलंडचा संघ भारतात होता. त्या वेळी झालेली पाच सामन्यांची मालिका भारताने 3-2 अशी निसटत्या फरकाने जिंकली होती. भारताच्या तुलनेत न्यूझीलंडचा संघ कितीही मागे असला तरी झुंझवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. यंदा या दौऱ्याच्या तयारीसाठी त्यांनी भारत 'अ' संघाविरुद्धच्या मालिकेसाठी पाठवलेल्या संघातील काही नवोदित खेळाडू आता मुख्य संघात घेतले. त्यामुळे त्यांना भारतात खेळण्याचा अनुभव मिळाला आहे. सोबत केन विल्यम्सन, रॉस टेलर, मार्टिन गुप्तिल, ट्रेंट बोल्ट आणि साउदी आहेच. 

विराट सेना, प्रतिस्पर्धी कोण याचा फारसा विचार न करता आपल्या क्षमतेनुसार खेळ करत आहे. त्यामुळेच सलग मालिका विजयांचा त्यांना विक्रम करता आलेला आहे. 

रहाणे पुन्हा राखीव? 
भारतीय संघासमोर संघ निवडीचा प्रश्‍न आहे. शिखर धवन परतल्यामुळे अजिंक्‍य रहाणेला पुन्हा राखीव खेळाडूंत राहावे लागण्याची शक्‍यता आहे. रहाणेला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, तेव्हा तेव्हा त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. फॉर्मात नसलेल्या मनीष पांडेऐवजी रहाणेला संधी देऊन त्याचे स्थान कायम ठेवले जाऊ शकते; परंतु तसे केल्यास रहाणेच्या फलंदाजीच्या क्रमवारीचा प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. 

कुलदीप-चहलची फिरकी 
गतवर्षी मालिका बरोबरीत असताना अखेरच्या सामन्यात लेगस्पिनर अमित मिश्राने न्यूझीलंडची फिरकी घेतली होती. आता यजुवेंदर चहल आणि चायनामन कुलदीप यादव यांचे कोडे सोडवणे न्यूझीलंडला सोपे जाणार नाही. भुवनेश्‍वर-बुमरा आणि पंड्या यांचा वेगवान मारा असेल. 

ढगाळ वातावरण? 
चार दिवसांपर्यंत मुंबईत सायंकाळी पाऊस पडत होता. उद्या पावसाची शक्‍यता नसली तरी आकाश ढगाळ असू शकेल; परंतु त्याचसोबत आर्द्रता वाढलेली आहे. न्यूझीलंडच्या संघाने दोन सराव सामने मुंबईत खेळलेले असल्यामुळे त्यांना या हवामानाचा सराव आहे. विशेष म्हणजे या मोसमातील वानखेडेवरचा हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे खेळपट्टीविषयी अंदाज सावधानतेनेच बांधला जाईल. 

हे माहीत आहे? 

  • विराट कोहली उद्या 200 वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. 
  • 199 सामन्यांत त्याने सर्वांपेक्षा अधिक 8767 धावा केल्या आहेत. 
  • अजित आगरकरनंतर भारताकडून सर्वाधिक वेगवान बळींचे अर्धशतक करण्यासाठी बुमरा 4 विकेट दूर. आगरकरने 23 सामन्यांतच ही कामगिरी केली होती. 

कर्णधार म्हणतात... 

कोणत्या खेळाडूंना अंतिम संघात स्थान मिळतेय यापेक्षा मालिका विजय महत्त्वाचा असतो. संघ सातत्याने समतोल असणे महत्त्वाचे असते. या मालिकेत राहुलऐवजी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. राहुल हा सलामीचा फलंदाज आहे. अजिंक्‍य रहाणेचीही अशीच स्थिती आहे. वरची फळी आता भक्कम असल्यामुळे दिनेश कार्तिकला मधल्या फळीत संधी मिळू शकते. 
- विराट कोहली, भारतीय कर्णधार 

आमची मधली फळी काहीशी नवखी आहे. काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे नवोदितांना संधी मिळू शकते. या संधीसाठी तेसुद्धा उत्सुक आहेत. 'अ' संघाच्या मालिकेसाठी काही खेळाडू अगोदरपासून भारतात आहेत. त्यामुळे त्यांना येथील हवामानाचा अंदाज आहे. ही आमच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते. 
- केन विल्यम्सन, न्यूझीलंड कर्णधार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites sports news cricket news India versus New Zealand Mumbai