नव्या नियमांनुसार क्रिकेट खेळणे 'एक्‍सायटिंग' असेल : कोहली 

पीटीआय
Saturday, 21 October 2017

आम्ही खेळताना कुठल्याही 'रॅंकिंग'चा विचार करत नाही. आम्हाला फक्त चांगले, दर्जेदार क्रिकेट खेळायचे आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये आम्ही तेच करत आलो आहोत आणि तेच आमचे मुख्य लक्ष्यही आहे. 
- विराट कोहली 

मुंबई : 'आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये 'आयसीसी'ने केलेले बदल प्रत्यक्ष खेळात अनुभवणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे', असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आज (शनिवार) केले. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येस झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने विविध विषयांवर मत मांडले. 

न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका भारतासाठी महत्त्वाची असेल. कारण, 'आयसीसी'ने नवे नियम लागू केल्यानंतरही ही भारताची पहिलीच द्विपक्षीय मालिका आहे. हे नियम लागू करण्यात आले, त्याआधीच भारत आणि ऑस्ट्रेलियामधील मालिका सुरू झाली होती. त्यामुळे त्या मालिकेत हे नियम लागू झाले नव्हते. 

कोहली म्हणाला, "नव्या नियमांपैकी काही नियम वेगळे आहेत. उदाहरणार्थ, फलंदाज धाव घेताना क्रीझमध्ये पोचला आणि नंतर त्याची बॅट हवेत गेली, तरीही बाद ठरविता येणार नाही किंवा 'डीआरएस'बद्दलही नियमावली बदलण्यात आली आहे. त्यामुळे या नव्या नियमांबद्दल सर्वच खेळाडूंना सजग राहावे लागेल. सुरवातीला असे करणे थोडे अवघड जाते; पण त्याचीही नंतर सवय होते. नव्या नियमांमुळे खेळ अधिक आक्रमक आणि अधिक व्यावसायिक होईल, असे वाटते. प्रत्यक्ष मैदानावर असताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. या नियमांमुळे आता त्यात आणखी भर पडेल आणि खेळाडूंना अधिक एकाग्रतेने खेळावे लागेल.'' 

नव्या नियमांनुसार, पायचीतसाठी 'डीआरएस'ची मदत घेतली आणि त्यात 'पंचांचा निर्णय' (अम्पायर्स कॉल) असे उत्तर आले, तरीही दाद मागणाऱ्या संघाची 'डीआरएस'ची एक संधी वाया जाणार नाही. तसेच, कसोटीमध्ये 80 षटकांनंतर 'डीआरएस'च्या नव्या संधी मिळण्याचा नियमही रद्द करण्यात आला आहे. याशिवाय, मैदानावर गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूला 'रेड कार्ड' दाखवून मैदानाबाहेर काढण्याचा अधिकार पंचांना देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites Sports News Cricket news India versus New Zealand Virat Kohli