या पराभवामुळे आमचे डोळे उघडले : रोहित शर्मा 

पीटीआय
Monday, 11 December 2017

संघाचा पराभव कुणालाच आवडत नाही. आता उर्वरित दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून मालिकेत पुनरागमन करण्याकडे आता आमचे लक्ष असेल. 
- रोहित शर्मा, भारतीय संघाचा कर्णधार

धरमशाला : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये दारूण पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा याने 'या पराभवामुळे आमचे डोळे उघडले आहेत' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. धरमशालामध्ये काल (रविवार) झालेल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव केवळ 112 धावांत संपुष्टात आला. त्यातही, महेंद्रसिंह धोनीच्या 65 धावांचा सिंहाचा वाटा होता. धोनीवगळता अन्य सर्व फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली होती. 

हे माफक आव्हान श्रीलंकेने 20.4 षटकांतच पार केले. कसोटी मालिका 0-1 अशी गमावलेल्या श्रीलंकेच्या संघाने एकदिवसीय मालिकेत भारतासमोर कठीण आव्हान उभे केले आहे. आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील व्यग्र कार्यक्रम पाहता भारतीय संघ व्यवस्थापनाने या मालिकेमध्ये कर्णधार विराट कोहलीसह अन्य प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे या मालिकेत कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपविण्यात आली. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात रोहितला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. 

रोहित म्हणाला, "फलंदाजीत आम्ही खूपच उणी कामगिरी केली. या सामन्यात आणखी 70-80 धावा करू शकलो असतो, तर चित्र कदाचित वेगळेच दिसले असते. अशा परिस्थितीशी चटकन जुळवून घेणे महत्त्वाचे असते. हा पराभव आम्हा सर्वांचेच डोळे उघडणारा होता.'' भारतीय फलंदाजी सपशेल कोसळली असताना अनुभवी धोनी मात्र एका बाजूने किल्ला लढवित होता. "संघ अडचणीत असताना काय करायला हवे, हे धोनीला चांगलेच ठाऊक आहे. त्याच्या या खेळीमुळे मला अजिबात आश्‍चर्य वाटले नाही. इतर फलंदाजांपैकी एकजण जरी त्याच्या बरोबर टिकून राहिला असता, तरीही फरक पडला असता. आम्ही गोलंदाजी करत असतानाही खेळपट्टीकडून साथ मिळत होती; पण 112 धावांचे आव्हान खूपच तोकडे होते'', असे रोहित म्हणाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites sports news cricket news India versus Sri Lanka Dharamshala ODI Rohit Sharma