विजय, पुजाराचा शतकी तडाखा, भारताकडे 107 धावांची आघाडी 

नरेंद्र चोरे
Saturday, 25 November 2017

नागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा येथील खेळपट्टीवर भारतीय फिरकीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मात्र, जेंव्हा भारतीय फलंदाज खेळण्यास आले, त्यावेळी श्रीलंकेच्या फिरकीला दबावही निर्माण करता आला नाही. पाहुण्या संघातील गोलंदाजांना दाद न देता मुरली विजय व चेतेश्‍वर पुजारा या जोडीने शतके झळकवून दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला मजबूत स्थितीत पोहोचविले. श्रीलंकेच्या सर्वबाद 205 या धावसंख्येला भारताने 2 बाद 312 असे चोख उत्तर देऊन मालिकेत आघाडी घेण्याच्या दिशेने भक्‍कम पाऊल टाकले. विजय-पुजारा जोडीने द्विशतकी भागीदारी करताना अनेक विक्रमही नोंदविले. 

नागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा येथील खेळपट्टीवर भारतीय फिरकीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मात्र, जेंव्हा भारतीय फलंदाज खेळण्यास आले, त्यावेळी श्रीलंकेच्या फिरकीला दबावही निर्माण करता आला नाही. पाहुण्या संघातील गोलंदाजांना दाद न देता मुरली विजय व चेतेश्‍वर पुजारा या जोडीने शतके झळकवून दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला मजबूत स्थितीत पोहोचविले. श्रीलंकेच्या सर्वबाद 205 या धावसंख्येला भारताने 2 बाद 312 असे चोख उत्तर देऊन मालिकेत आघाडी घेण्याच्या दिशेने भक्‍कम पाऊल टाकले. विजय-पुजारा जोडीने द्विशतकी भागीदारी करताना अनेक विक्रमही नोंदविले. 

विजय आणि पुजाराने जवळ-जवळ पाच तास चिवट फलंदाजी करून श्रीलंकेच्या नवख्या गोलंदाजांना एकप्रकारे धडाच शिकविला. भारताकडे असलेली 107 धावांची भागीदारी लक्षात घेता श्रीलंकेला ही कसोटी वाचविणे निश्‍चितच कठिण जाणार आहे. 1 बाद 11 या धावसंख्येवरून पहिल्या डावाला सुरूवात करणाऱ्या मुरली विजय व चेतेश्‍वर पुजाराने सकाळच्या सत्रात सावध फलंदाजी करताना 86 धावा गोळा केल्या. उपाहाराला 1 बाद 97 अशा सुस्थितीत असलेल्या या दोघांनी त्यानंतरच्या सत्रातही धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. 

कोलकाता कसोटीत संघाबाहेर राहिलेल्या विजयने शिखर धवनच्या अनुपस्थितीचा पुरेपूर लाभ घेत करिअरमधील दहावे शतक झळकावून तिसऱ्या कसोटीसह दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही मजबूत दावा ठोकला. 51 वा कसोटी सामना खेळणाऱ्या विजयने अकरा चौकार व एका षटकारासह 221 चेंडूंत 128 धावा फटकावल्या. त्याने पुजारासोबत 295 मिनिटे चिवट फलंदाजी करीत दुसऱ्या गड्यासाठी 430 चेंडूंत 209 धावांची भागीदारी केली. या मैदानावरील दुसऱ्या गड्यासाठीची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. दोघांनी आतापर्यंत एकूण दहा शतकी भागीदारी केल्या हे उल्लेखनीय. 

2017 मध्ये धर्मशाळा येथे शेवटचा कसोटी खेळलेल्या विजयचे श्रीलंकेविरूद्‌धचे हे पहिलेच शतक होय. नोव्हेंबर 2008 मध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरूद्‌ध कसोटी पदार्पण करणाऱ्या विजयचे श्रीलंकेविरूद्‌धचे आणि नागपुरातीलही हे पहिलेच शतक ठरले. ही भागीदारी मोडीत काढण्यासाठी कर्णधार दिनेश चंडिमलने पाच गोलंदाज आळीपाळीने आजमावले. परंतु, विजय-पुजारा जोडीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अखेर हेराथने विजयला बाद करून लंकेसाठी डोकेदुखी ठरलेली ही भागीदारी मोडीत काढली. कारकीर्दीतील चौदावे शतक पूर्ण करणाऱ्या पुजाराने 13 चौकारांच्या मदतीने 284 चेंडूंत नाबाद 121 धावा केल्या. 

धावफलक 
श्रीलंका पहिला डाव : 205
भारत पहिला डाव :
के. एल. राहुल त्रि. गो. गमगे 7, मुरली विजय झे. परेरा गो. हेराथ 128, चेतेश्‍वर पुजारा खेळत आहे 121, विराट कोहली खेळत आहे 54, अवांतर 2, एकूण 98 षटकांत 2 बाद 312. गडी बाद क्रम : 1-7, 2-216. गोलंदाजी : सुरंगा लकमल 18-2-58-0, लाहिरू गमगे 22-7-47-1, रंगना हेराथ 24-8-45-1, दासून शनाका 13-3-43-0, दिलरुवान परेरा 21-0-117-0. 

दृष्टिक्षेपात 

  • मुरली विजयचे हे कारकीर्दीतील दहावे, श्रीलंकेविरूद्‌ध पहिले व नागपुरातीलही पहिलेच शतक ठरले. 
  • मुरली विजय व चेतेश्‍वर पुजाराने दुसऱ्या गड्यासाठी एकूण 209 धावा जोडल्या. दोघांनी केलेली ही दहावी शतकी भागीदारी ठरली. 
  • जामठा स्टेडियमवर दुसऱ्या गड्यासाठी नोंदली गेलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली 
  • विजयला 19 व 61 धावांवर दोन जीवदाने. 
  • चेतेश्‍वर पुजाराचे कारकीर्दीतील हे चौदावे शतक 
  • श्रीलंकेला तब्बल चार तास व 55 मिनिटे व 431 चेंडूंनंतर मिळाले दुसरे यश. 
  • यजमान भारताकडे एकूण 107 धावांची आघाडी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites sports news cricket news India versus Sri Lanka Murali Vijay Cheteshwar Pujara