रोहितचे विक्रमी द्विशतक; श्रीलंकेवर 141 धावांनी विजय

वृत्तसंस्था
Wednesday, 13 December 2017

चंदिगड : मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागल्याचा भारतीय फलंदाजांचा 'राग' श्रीलंकेच्या गोलंदाजीवर निघाला आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने तब्बल 392 धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या सामन्यात भेदक कामगिरी केलेल्या श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढत कर्णधार रोहित शर्माने कारकिर्दीतील तिसरे द्विशतक झळकाविण्याचा पराक्रम केला. रोहितने सलामीला येत नाबाद 208 धावा केल्या. या आव्हानासमोर श्रीलंकेला 50 षटकांत 251 धावांपर्यंतच मजल मारता आली. 141 धावांनी मिळविलेल्या या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली. 

पहिल्या सामन्यात केवळ 112 धावांमध्ये गुंडाळत श्रीलंकेने भारतावर वर्चस्व गाजविले होते. त्या सामन्यात भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. हे अपयश धुवून काढण्याच्या निर्धारानेच भारतीय फलंदाज आज मैदानात उतरले. श्रीलंकेने आजही नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रोहित शर्मा-शिखर धवन या जोडीने सुरवातीला सावध आणि नंतर आक्रमक पवित्रा स्वीकारत वेगाने धावा केल्या. या दोघांनी 21 षटकांत 115 धावांची सलामी दिली. धवन 68 धावा करून बाद झाला. 

त्यानंतर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यरने आत्मविश्‍वासानेच फलंदाजीस सुरवात केली. त्याने केवळ 70 चेंडूंत 88 धावा केल्या. रोहित आणि अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 213 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे श्रीलंकेच्या गोलंदाजांना पुरते हताश केले. 45 व्या षटकात अय्यर बाद झाला, तेव्हा भारताने 328 धावा केल्या होत्या. त्यानंतरच्या डावाच्या शेवटच्या 27 चेंडूंत भारताने 64 धावा फटकाविल्या. 

पहिल्या सामन्यात केवळ 13 धावा देत भारताला धक्के देणाऱ्या सुरंगा लकमलला या सामन्यात आठ षटके गोलंदाजी करून एकही बळी मिळाला नाहीच; शिवाय त्याच्या गोलंदाजीवर 71 धावा चोपण्यात आल्या. नुवान प्रदीपने तर 10 षटकांत 106 धावा दिल्या. 

या आव्हानासमोर श्रीलंकेची सुरवात खराब झाली. पहिल्या आठ षटकांतच श्रीलंकेचे दोन्ही सलामीवीर बाद झाले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अनुभवी अँजेलो मॅथ्यूजने झळकाविलेले नाबाद शतक ही श्रीलंकेसाठी एकमेव जमेची बाजू ठरली. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्याच्या दडपणाखाली श्रीलंकेचे इतर फलंदाज फार काळ खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. 

भारताकडून युझवेंद्र चहलने तीन, बुमराहने दोन गडी बाद केले. पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने दहा षटकांत 65 धावा देत एक गडी बाद केला. पांड्या आणि भुवनेश्‍वर कुमारलाही प्रत्येकी एक विकेट मिळाली. 

एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 

  • 264 : रोहित शर्मा 
  • 237 : मार्टिन गुप्टील 
  • 219 : वीरेंद्र सेहवाग 
  • 215 : ख्रिस गेल 
  • 209 : रोहित शर्मा 
  • 208 : रोहित शर्मा 
  • 200 : सचिन तेंडुलकर 

धावफलक 
भारत : 50 षटकांत 4 बाद 392 
रोहित शर्मा नाबाद 208, 153 चेंडू, 13 चौकार, 12 षटकार 
शिखर धवन 68, 67 चेंडू, 9 चौकार 
श्रेयस अय्यर 88, 70 चेंडू, 9 चौकार, 2 षटकार 
महेंद्रसिंह धोनी 7, 5 चेंडू, 1 षटकार 
हार्दिक पांड्या 8, 5 चेंडू, 1 चौकार 
अवांतर : 13 
श्रीलंका : 50 षटकांत 8 बाद 251 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites sports news cricket news India versus Sri Lanka Rohit Sharma Double century