esakal | सलग पराभवांमुळे 'वर्ल्ड कप'साठी थेट पात्र ठरण्यात श्रीलंका अपयशी 
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lanka Cricket Team

सलग पराभवांमुळे 'वर्ल्ड कप'साठी थेट पात्र ठरण्यात श्रीलंका अपयशी 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

दुबई : भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील निराशाजनक कामगिरीमुळे एकेकाळच्या विश्‍वविजेत्या श्रीलंकेच्या संघावर आता आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्रता फेरीत लढण्याची नामुष्की येण्याची दाट शक्‍यता आहे. दोन वर्षांनी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी यजमान संघ वगळता एकदिवसीय क्रमवारीत पहिले सात संघ थेट पात्र ठरणार आहेत. यासाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंतच्या क्रमवारीचा आधार घेतला जाणार आहे. 

भारताविरुद्धच्या मालिकेमध्ये 3-2 असा पराभव झाला असता, तरीही श्रीलंकेचा संघ विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरू शकला असता. पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे श्रीलंकेला थेट पात्र ठरण्यासाठी आता वेस्ट इंडीजच्या पराभवाची वाट पाहावी लागणार आहे. 

येत्या 30 सप्टेंबरपर्यंत वेस्ट इंडीज सहा एकदिवसीय सामने खेळणार आहे. हे सर्व सहा सामने विंडीजने जिंकले, तर विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी ते थेट पात्र ठरतील. मात्र, श्रीलंकेने भारताविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला आणि विंडीजचा एका सामन्यात पराभव झाला, तर श्रीलंकेला संधी मिळू शकते. येत्या 13 सप्टेंबर रोजी विंडीजचा आयर्लंडविरुद्ध सामना होणार आहे. त्यानंता 19 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीत विंडीज आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची मालिका होणार आहे. 

भारताविरुद्धच्या अखेरच्या सामन्यातही श्रीलंकेचा पराभव झाला, तर आयर्लंडचा पराभव करून वेस्ट इंडीज श्रीलंकेची गुणतक्‍त्यात बरोबरी करेल. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध 5-0 किंवा 4-1 असा विजय मिळविला, तर वेस्ट इंडीजचे मानांकन उंचावेल. 

2019 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र न ठरलेल्या संघांना पुढील वर्षी पात्रता फेरीत खेळावे लागणार आहे. यात एकदिवसीय क्रमवारीतील तळातील चार संघ आणि 'वर्ल्ड क्रिकेट लीग'मधील पहिले चार संघ खेळतील. या पात्रता फेरीतील पहिले दोन संघ विश्‍वकरंडक स्पर्धेत दाखल होतील. 

loading image