आता लक्ष्य मालिका विजयाचे; भारत-श्रीलंका आज अखेरचा एकदिवसीय सामना 

वृत्तसंस्था
Sunday, 17 December 2017

विशाखापट्टणम : धरमशाला येथे घसरलेली गाडी मोहालीत रुळावर आणल्यानंतर 'टीम इंडिया'ने आता श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिका विजयाचे लक्ष्य बाळगले आहे. त्याचबरोबर मायदेशात मालिका विजयाची परंपराही त्यांना कायम ठेवायची आहे. रोहित शर्माच्या अविस्मरणीय द्विशतकाने वर्चस्वाची सुई भारताच्या बाजूला पूर्णपणे झुकलेली आहे. 

विशाखापट्टणम : धरमशाला येथे घसरलेली गाडी मोहालीत रुळावर आणल्यानंतर 'टीम इंडिया'ने आता श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिका विजयाचे लक्ष्य बाळगले आहे. त्याचबरोबर मायदेशात मालिका विजयाची परंपराही त्यांना कायम ठेवायची आहे. रोहित शर्माच्या अविस्मरणीय द्विशतकाने वर्चस्वाची सुई भारताच्या बाजूला पूर्णपणे झुकलेली आहे. 

2015 मध्ये वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला आणि एकदिवसीय मालिका जिंकली होती. त्यानंतर मात्र भारतीय संघ मायदेशात अपराजित राहिलेला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळालेले हे यश कायम ठेवण्याची जबाबदारी रोहितच्या संघावर आहे. दुसऱ्या बाजूला श्रीलंकेलाही इतिहास घडवण्याची संधी आहे. भारतात त्यांना अद्याप एकही एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. आठ मालिका पराभव आणि एका मालिकेत बरोबरी अशी त्यांची कामगिरी आहे. 

विशाखापट्टणमचा इतिहासही भारताच्या बाजूने आहे. येथे झालेल्या सातपैकी पाच सामन्यांत भारताचा विजय झालेला आहे. एका सामन्यात पराभव आणि एक सामना अनिर्णित, अशी भारताची येथील कामगिरी आहे. 

धवन, अय्यरही फॉर्मात 
भारताच्या दृष्टीने समाधानाची बाब म्हणजे केवळ रोहित शर्मालाच फॉर्म सापडला असे नाही तर शिखर धवन आणि तिसऱ्या क्रमांकावरील श्रेयस अय्यर यांनीही तुफानी फटकेबाजी केली. त्यामुळे श्रीलंका गोलंदाजांसमोरच्या अडचणीत वाढ झाली आहे. वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर आणि हवामानातच श्रीलंकेचे गोलंदाज प्रभावी ठरतात हे त्यांच्या भारत दौऱ्यातील आतापर्यंतच्या सामन्यातून सिद्ध झाले आहे. विशाखापट्टणमची खेळपट्टी फलंदाजांना साथ देण्यारी असते, असा इतिहास सांगतो. 

कार्तिक, पांडेवर दडपण 
श्रेयस अय्यरने मोहालीतील सामन्यात केवळ शानदार फलंदाजीच केली नाही तर शतकापेक्षा संघहिताला अधिक प्राधान्य दिल्यामुळे त्याच्या वृत्तीचे कौतुक होत आहे. आता मधल्या फळीतील फलंदाज दिनेश कार्तिक आणि मनीष पांडे यांच्यावर निर्णायक कामगिरी करण्यासाठी दडपण वाढले आहे. पुन्हा एकदा अजिंक्‍य रहाणेला राखीव खेळाडूतच राहावे लागणार हे निश्‍चित आहे. 

गोलंदाजीत पर्यात कमी 
मोहालीत भारताने धावांचा हिमालय उभा केल्यामुळे गोलंदाजांवर दडपण आलेच नव्हते. खरे तर त्या सामन्यात भारत पाचच गोलंदाजांसह खेळला होता. उद्याही अशीच रचना असेल; पण एखाद्या गोलंदाजाची जास्त पिटाई झाली तर रोहित शर्मासमोर प्रश्‍नचिन्ह उभे राहू शकते. सहावा गोलंदाज म्हणून श्रेयस अय्यरने त्या सामन्यात एक षटक टाकले होते. रणजी सामन्यात तो बदली गोलंदाज म्हणून गोलंदाजी करतो. आंतरराष्ट्रीय सामन्याचा त्याला अनुभव नाही. या पार्श्‍वभूमीवर भुवनेश्‍वर कुमार, बुमराह, हार्दिक, चाहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावरची जबाबदारी वाढली आहे. 
मोहालीत श्रीलंकेचा पराभव झाला असला तरी अँजेलो मॅथ्यूजने शतक करून आपल्या सहकाऱ्यांना दिलासा दिला होता. उद्या त्याला रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजांना मेहनत करावी लागेल. 

रोहितची दहशत 
धरमशाला येथे झालेल्या पराभवामुळे भारत एकदिवसीय क्रमवारीत आता पहिल्या स्थानापासून बाजूला गेला आहे; पण उद्याचा सामना जिंकून मालिका विजयाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवण्याची संधी आहे. मोहालीतील सामना भारताने जिंकताना श्रीलंकेच्या मानसिकतेचाही पराभव केला. धरमशालेत भारतीय फलंदाजीचे तीनतेरा वाजवून श्रीलंकेचा संघ प्रामुख्याने त्यांचे गोलंदाज 'सातवे आसमॉंपर' होते. रोहितने मोहालीत त्यांना जमिनीवर आणलेच नाही, तर स्वतःची दहशत बसवली. त्यामुळे आता श्रीलंकेला उद्याच्या निर्णायक सामन्यात वेगळे डावपेच लढवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites sports news India versus Sri Lanka Rohit Sharma