धोनीचे काऊंटडाऊन सुरू...? 

वृत्तसंस्था
Wednesday, 16 August 2017

पुढील काही महिन्यांपासून प्रामुख्याने एकदिवसीय संघात बहुतांशी खेळाडूंना आलटून पालटून संधी दिली जाणार हे निश्‍चित झाले आहे. अश्‍विनला श्रीलंकेतील मालिकेसाठी विश्रांती दिली असे सांगण्यात आले; मात्र तो या काळात इंग्लिश कौंटी स्पर्धा खेळायला जाणार आहे. अश्‍विनला संधी न देणे हा संघ निवड प्रक्रियेचा भाग होता, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.

कॅंडी : श्रीलंकेतील एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीची निवड करण्यात आलेली आहे, परंतु यापुढे त्याची थेट निवड केली जाईल असे नाही, त्यामुळे त्याला आपले स्थान कायम ठेवण्यासाठी कामगिरी करत राहावे लागेल, असे मत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केले. 

2019 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेचा विचार करून भारतीय संघाच्या निवड प्रक्रियेस सुरुवात झाली आहे आणि म्हणूनच की काय, युवराज सिंगला श्रीलंका दौऱ्यात स्थान देण्यात आले नाही असे बोलले जात आहे. माजी कर्णधार आणि 19 वर्षांखालील युवक संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने दीड महिन्यापूर्वी युवराज आणि धोनीच्या स्थानाबाबत प्रश्‍नचिन्ह उभे केले होते. 

श्रीलंका दौऱ्यासाठी संघनिवड करताना धोनीबाबत विचार झाला का? या प्रश्‍नावर प्रसाद म्हणाले, संघनिवडीत प्रत्येक खेळाडूबाबत चर्चा होत असते. केवळ धोनीचाच प्रश्‍न नाही. जेव्हा खेळाडू निवडत असतो तेव्हा संघ म्हणून विचार होत असतो आणि भविष्याचाही विचार करत असतो. 

2019 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी धोनीकडे तुम्ही कसे पाहता आथवा इतर खेळाडूंप्रमाणे धोनीलाही रोटेट करणार का? या प्रश्‍नावर प्रसाद म्हणतात, आम्ही याबाबत बारकाईने विचार करणार आहोत. तो एक महान खेळाडू आहे हेही लक्षात ठेवले जाईल, परंतु निश्‍चितच एका विचाराने आम्ही पुढे जाणार आहोत. 

दिल्लीच्या रिषभ पंतकडे धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे. सध्या तो भारत अ संघाबरोबर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. रिषभ एक गुणवान खेळाडू आहे. भविष्याच्या दृष्टीने आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. अ संघातून संधी देत आम्ही त्याला तयार करत आहोत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नसली, तरी तो आमच्या नजरेतून दूर झालेला नाही. भारत अ संघाचा अजून एक दौरा आहे. तो सर्वसाधारपणे ट्‌वेन्टी-20 चा खेळाडू आहे. त्या दृष्टीनेही आम्ही त्याच्याकडे पाहत आहोत, असे प्रसाद यांनी सांगितले. 

पुढील काही महिन्यांपासून प्रामुख्याने एकदिवसीय संघात बहुतांशी खेळाडूंना आलटून पालटून संधी दिली जाणार हे निश्‍चित झाले आहे. अश्‍विनला श्रीलंकेतील मालिकेसाठी विश्रांती दिली असे सांगण्यात आले; मात्र तो या काळात इंग्लिश कौंटी स्पर्धा खेळायला जाणार आहे. अश्‍विनला संधी न देणे हा संघ निवड प्रक्रियेचा भाग होता, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले. 

म्हणून युवराजला वगळले? 
खेळाडूंना आलटूनपालटून संधी देण्यामागचा नेमका विचार कोणता? या प्रश्‍नावर प्रसाद म्हणाले, जर माझा हात हृदयावर ठेवला तर चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर आपल्याला तंदुरुस्त आणि कणखर संघाची गरज आहे, असे वाटू लागले. तंदुरुस्ती आणि क्षेत्ररक्षणाचा स्तर उंचावण्याची अत्यंत गरज आहे आणि याच निकषावर संघनिवड केली जाईल. प्रसाद यांच्या या निकषामध्ये निवृत्तीकडे झुकलेला युवराज बसत नसावा म्हणून त्याला वगळण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites sports news MS Dhoni Team India Virat kohli