भारतीय गोलंदाजांनी विजय खेचून आणला; भारताने जिंकली तिसरी कसोटी! 

Sunday, 28 January 2018

एल्गर आणि आमलाने चौथ्या दिवशी फलंदाजी चालू केल्यावर पहिल्या अर्ध्या तासात सगळे चकित झाले, कारण खेळपट्टीतली जादू गुप्त झाली होती. पहिले तीन दिवस प्रत्येक षटकात एकदातरी फलंदाज चकत होता किंवा त्याला चेंडूचा आघात सहन करावा लागत होता. चौथ्या दिवशी एल्गर आणि आमलाने अगदी सहजी गोलंदाजांना तोंड दिले. भारतीय चार गोलंदाजांनी बरेच परिश्रम करून दोन सत्रांत एकाही फलंदाजाला बाद करण्यात यश आले नाही. 

जोहान्सबर्ग : भारताने गोलंदाजांच्या पराक्रमामुळे तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 63 धावांनी हरविले. दोन कसोटींसह मालिका गमावल्यानंतर भारताला दिलासा मिळाला. वॉंडरर्सच्या ज्या खेळपट्‌टीने फलंदाजांना पहिले तीन दिवस शेकाटून काढले, त्याच विकेटने चौथ्या दिवशी पहिले चार तास फलंदाजांना त्यामानाने काहीच त्रास दिला नाही. एकदम शांत झालेल्या विकेटवर आमला आणि एल्गरने फारच समंजस फलंदाजी केली. दोघांनी 119 धावांची भागीदारी रचून यजमान संघाला विजयाची आशा दाखवली. 

चहापानाअगोदर 10 मिनिटे आणि नंतरचा अर्धा तास भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. 1 बाद 124 वरून उरलेल्या 9 विकेट्‌स 53 धावांत गेल्या. सलामीला येऊन नाबाद राहताना एल्गरने 86 धावा केल्या. शमीने वेगवान मारा करून 5 फलदांजांना तंबूचा रस्ता दाखवला. अखेर आफ्रिकेचा डाव 177 धावांत संपला. 

तिसरा दिवस वादंगांनी गाजला. खेळपट्‌टी क्रिकेट खेळण्यास लायक आहे का नाही? अशी शंका यावी इतका तीन दिवस चेंडू जादू दाखवत होता. गोलंदाज स्विंग, वेग आणि चेंडू टाकल्यावर मिळणारी सहजी उसळी याचा आनंद घेत होते आणि फलंदाजांची कधी बोटे तर कधी बरगड्या शेकाटून निघत होत्या. चौथ्या दिवशी खेळ चालू होणार का नाही? अशी शंका घेऊन दोनही संघ आणि प्रेक्षक मैदानात जमले. अपेक्षा होती की भारतीय वेगवान गोलंदाज फलंदाजांची सत्त्वपरीक्षा बघतील; पण बघायला भलतेच मिळाले. 

एल्गर आणि आमलाने चौथ्या दिवशी फलंदाजी चालू केल्यावर पहिल्या अर्ध्या तासात सगळे चकित झाले, कारण खेळपट्टीतली जादू गुप्त झाली होती. पहिले तीन दिवस प्रत्येक षटकात एकदातरी फलंदाज चकत होता किंवा त्याला चेंडूचा आघात सहन करावा लागत होता. चौथ्या दिवशी एल्गर आणि आमलाने अगदी सहजी गोलंदाजांना तोंड दिले. भारतीय चार गोलंदाजांनी बरेच परिश्रम करून दोन सत्रांत एकाही फलंदाजाला बाद करण्यात यश आले नाही. 

एल्गर आणि आमलाने संयमाबरोबर तंत्राचा सुरेख वापर करून भक्कम बचाव केला. खराब चेंडूंवर धावा घेण्यातही दोघे चुकले नाहीत. सकाळपासून जवळपास 4 तास नाबाद राहून दोघा जिगरबाज फलंदाजांनी अर्धशतके करून यजमान संघाच्या अशक्‍यप्राय वाटणाऱ्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. 119 धावांची भागीदारी ईशांत शर्माने तोडली. आमला बाद झाल्यावर डिव्हिलीयर्स लगेच बाद झाला. चहापानाला एल्गर अर्धशतक करून नाबाद परतला. तेव्हा आफ्रिकेला अजून 105 धावांची गरज होती आणि त्यांचे 7 फलंदाज बाद व्हायचे बाकी होते. 

चहापानानंतर भारतीय गोलंदाज थकले असून, वेगळ्या जिद्दीने मैदानात उतरले. ईशांतने वेगाने आत येणाऱ्या चेंडूवर कप्तान फाफ डू प्लेसिसला बोल्ड केले. क्विंटन डिकॉक परत एकदा शून्यावर तंबूत परतला. मग शमीने चेंडू हाती घेऊन फिलॅंडर आणि फुलक्वायोला एका षटकात बाद केले आणि पहिल्या डावात चिवट फलंदाजी करणाऱ्या रबाडाला भुवनेश्‍वरने बाद केले. सामन्याचा नूर पालटला. शमीने भेदक मारा करताना त्या एका स्पेलमधे 4 फलंदाजांना बाद केले. 

अखेर लुंगीला शमीने बाद करून मौल्यवान कसोटी विजय हाती घेतला. विराटने डरकाळी फोडली तसेच बाकीच्या खेळाडूंनी नाच करून आनंद साजरा केला. वॉंडरर्स मैदानावर भारतीय संघाची पराभूत न होण्याची परंपरा पुढे चालू राहिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Mohammad Shami India versus South Africa Virat Kohli