विजयाचे समाधान तरीही सुधारणा आवश्‍यक : रोहित

पीटीआय
Saturday, 10 March 2018

कोलंबो : पहिला सामना गमावल्यानंतर बांगलादेशविरुद्ध कामगिरीत सुधारणा होणे अपेक्षित होते आणि चांगला खेळ करून आम्ही विजय मिळवला. तरीही प्रामुख्याने क्षेत्ररक्षणात सुधारणा करावी लागेल, असे मत भारतीय कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले. निद्‌हास करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशचा पराभव करून भारताने गाडी रुळावर आणली. 

या विजयानंतर रोहित म्हणाला, ''या सामन्यात आमचा खेळ चांगला झाला. असा खेळ खरे तर अपेक्षित होता. गोलंदाजीत श्रीलंकेविरुद्ध ज्या चुका केल्या त्या आम्ही बांगलादेशविरुद्ध टाळल्या. बांगलादेशविरुद्ध आमच्या गोलंदाजांनी टप्पा थोडासा आखूड ठेवला आणि त्यांना मोठे फटके मारण्याचे आव्हान दिले. या जाळ्यात त्यांचे फलंदाज बाद होत गेले. या स्पर्धेत भारत सहा प्रमुख खेळाडूंसह खेळत आहे. वेगवान गोलंदाजी कमकुवत जाणवत आहे. श्रीलंकेविरुद्ध 175 धावांचे संरक्षण करता आले नव्हते. शार्दूल ठाकूरने एकाच षटकात 27 धावा दिल्या होत्या, तर आयपीएलमध्ये चांगला भाव मिळालेला जयदेव उनडकटही महागडा ठरला होता. 

बांगलादेशविरुद्ध गोलंदाजीत सुधारणा झाली असली तरी क्षेत्ररक्षणात मात्र झेल सोडण्याची स्पर्धा सुरू होती. संपूर्ण डावात चार सोपे झेल सोडण्यात आले. त्यामध्ये भरवशाच्या सुरेश रैनाकडूनही झेल सुटला. पुढील सामन्यांसाठी आम्हाला क्षेत्ररक्षणात सुधारणा करावी लागेल. संघात चांगले क्षेत्ररक्षक आहेत. ज्या चुका बांगलादेशविरुद्ध केल्या, त्या पुढे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल, असे रोहितने सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Rohit Sharma India versus Bangladesh