न्यूझीलंडचा इंग्लंडवर विक्रमी विजय

पीटीआय
Thursday, 8 March 2018

ड्युनेडिन : मधल्या फळीतील फलंदाज रॉस टेलरच्या 147 चेंडूंतील नाबाद 181 धावांच्या खेळीने न्यूझीलंडने बुधवारी चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडने इंग्लंडचे 336 धावांचे आव्हान पार करताना विक्रमी विजय मिळविला. पाच सामन्यांच्या मालिकेत आता 2-2 अशी बरोबरी झाली आहे. 

ड्युनेडिन : मधल्या फळीतील फलंदाज रॉस टेलरच्या 147 चेंडूंतील नाबाद 181 धावांच्या खेळीने न्यूझीलंडने बुधवारी चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडने इंग्लंडचे 336 धावांचे आव्हान पार करताना विक्रमी विजय मिळविला. पाच सामन्यांच्या मालिकेत आता 2-2 अशी बरोबरी झाली आहे. 

प्रथम फलंदाजी करताना जॉनी बेअरस्टॉ (138) आणि ज्यो रुट (102) यांच्या शतकी खेळीने न्यूझीलंडने 9 बाद 335 धावा केल्या. न्यूझीलंडने 5 बाद 339 धावा करून विजय मिळविला. यात रॉस टेलरची वैयक्तिक सर्वोच्च खेळी निर्णायक ठरली. टेलरचे कारकिर्दीमधील 19वे शतक ठरले. त्याच्या खेळीने इंग्लंड फलंदाजांची कामगिरी मात्र झाकोळली गेली. 

आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला सुरवातीलाच धक्का बसला होता. मार्टिन गुप्टिल आणि कॉलिन मुन्‍रो हे दोन्ही सलामीचे फलंदाज भोपळाही फोडू शकले नव्हते. अशा वेळी कर्णधार केन विल्यम्सन आणि टेलर यांनी 85 धावांची भागीदारी करून डाव सावरला. पण, त्या वेळी स्टोक्‍सने विल्यम्सनला (45) बाद केले. त्यानंतर टेलरला लॅथमने सुरेख साथ दिली. या जोडीने 187 धावांची भागीदारी केली. यात लॅथमच्या 71 धावांचा वाटा होता. याच दरम्यान धावबाद होण्यापासून वाचण्यासाठी डाईव्ह मारताना टेलरची मांडी दुखावली. पण, त्या वेदना विसरून फलंदाजी सुरू ठेवली. त्यांच्या पाठलागावर जरूर मर्यादा पडल्या. लॅथम आणि ग्रॅंडहोम बाद झाले. 10 षटकांत 80 धावा, असे आव्हान असताना निकोल्सने टेलरला स्ट्राईक देण्याचे काम केले. अखेरच्या षटकात निकोल्सने षटकार ठोकूनच विजयावर शिक्कामोर्तब केले. चमकदार विजयाचा आनंद साजरा करण्याचेही त्राण त्या वेळी टेलरकडे नव्हते. डोळ्यात पाणी आलेला टेलर लंगडतच ड्रेसिंगरुमकडे परतला. 

संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड 50 षटकांत 9 बाद 335 (जॉनी बेअरस्टॉ 138 -106 चेंडू, 14 चौकार, 7 षटकार, ज्यो रुट 102 -101 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार, जेसन रॉय 42, टॉम क्‍युरन 22, ईश सोधी 4-58, ट्रेंट बोल्ट 2-56, कॉलिन मुन्‍रो 2-53)
पराभूत वि. न्यूझीलंड 49.3 षटकांत 5 बाद 339 (रॉस टेलर नाबाद 181 -147 चेंडू, 17 चौकार, 6 षटकार, टॉम लॅथम 71 -67 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार, केन विल्यम्सन 45, ग्रॅंडहोम 23, टॉम क्‍युरन 2-57)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Ross Taylor New Zealand versus England