esakal | 'सुदैवी' वॉर्नरचा शतकी तडाखा 
sakal

बोलून बातमी शोधा

David Warner

'सुदैवी' वॉर्नरचा शतकी तडाखा 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाने चौथ्या ऍशेस कसोटीत संथ, पण भक्कम सुरवात केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने शतक फटकावले. 99 धावांवर टॉम करनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला होता, पण त्याच्या सुदैवाने नो-बॉल पडल्याचे रिप्लेत दिसले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर वॉर्नरने 21वे कसोटी शतक झळकावले आणि मग जिगरबाज जल्लोष केला. 

पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 3 बाद 244 अशी मजल मारली. कर्णधार स्मिथ 65 धावांवर नाबाद होता आणि शॉन मार्श त्याला साथ देत होता. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. 'एमसीजी'ची (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड) खेळपट्टी गोलंदाजांना प्रतिकूल होती. वॉर्नर नेहमी आक्रमक खेळ करतो, पण यावेळी तो नव्वदीत सुमारे 40 मिनिटे झगडत होता. तो 99 धावांवर असताना नाट्य घडले.

पदार्पण करणाऱ्या करनच्या पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर त्याने फटका मारला. बॅटच्या वरच्या भागाला लागून उंच उडालेला झेल मिडॉनला टिपला गेला. त्यानंतर इंग्लंडचे खेळाडू एकच जल्लोष करीत होते, तर वॉर्नरने पॅव्हेलियनचा रस्ता धरला होता. दरम्यान, 'रिप्ले' सुरू झाली आणि त्यात करनकडून नो-बॉल पडल्याचे दिसून आले. वॉर्नर मग पुन्हा सज्ज झाला. त्याने एकेरी धाव घेत शतक पूर्ण करीत इंग्लंडच्या जखमेवर मीठ चोळले. मग त्याने हवेत उंच उडी घेत नेहमीच्या शैलीत जिगरबाज जल्लोष केला. त्यावेळी 88 हजार 172 प्रेक्षकांनी त्याला जोरदार मानवंदना दिली. 

वॉर्नरने 130 चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला होता. त्यानंतर त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो 103 धावांवर बाद झाला. जेम्स अँडरसनच्या चेंडूवर त्याने यष्टीमागे झेल दिला. कांगारूंनी पहिल्या सत्रात बिनबाद 102 अशी घोडदौड केली होती. पुढील दोन सत्रांत इंग्लंडच्या गोलंदाजांनी प्रखर उन्हात टिच्चून मारा केला. त्यामुळे कांगारूंच्या धावगतीला खीळ बसली. वॉर्नर-बॅंक्रॉफ्ट यांनी 122 धावांची सलामी दिली. दुसऱ्या सत्रात वोक्‍सने ही जोडी फोडली. त्यानंतर वॉर्नर बाद झाला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्यासाठी विकेटचा दुष्काळ अखेर संपला. त्याला दुसऱ्या कसोटीपासून 414 चेंडू विकेट मिळविता आली नव्हती. त्याने ख्वाजाला बाद केले.

स्मिथचा धोका कायम 
या मालिकेत विलक्षण फॉर्मात असलेला प्रतिस्पर्धी कर्णधार स्मिथ याचा इंग्लंडसमोरील मुख्य धोका कायम आहे. 2014 पासून तो मेलबर्न कसोटीत जबरदस्त फॉर्म दाखवीत आहे. त्यावर्षी भारताविरुद्ध त्याने 192 धावा केल्या. त्यानंतर गेल्या दोन मोसमांत तो तीन डावांत बादच झालेला नाही. 2015 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 134 व 70 आणि 2016 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 165 अशी त्याची कामगिरी आहे. पाच डावांमध्ये त्याने 163.66च्या सरासरीने 491 धावा केल्या आहेत. 

वॉर्नरचा माइलस्टोन 
वॉर्नरने या खेळीदरम्यान 70 व्या कसोटीत सहा हजार धावांचा टप्पा पार केला. आता तो ऑस्ट्रेलियातर्फे हा टप्पा वेगाने गाठणाऱ्यांच्या क्रमवारीत संयुक्त चौथा आहे. डॉन ब्रॅडमन, रिकी पॉंटिंग, मॅथ्यू हेडन आणि ग्रेग चॅपेल यांच्या पंक्तीत त्याने स्थान मिळविले.

धावफलक 
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव :
कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट पायचीत गो. वोक्‍स 26-95 चेंडू, 2 चौकार, डेव्हिड वॉर्नर झे. बेअरस्टॉ गो. अँडरसन 103-151 चेंडू, 13 चौकार, 1 षटकार, उस्मान ख्वाजा झे. बेअरस्टॉ गो. ब्रॉड 17-65 चेंडू, 2 चौकार, स्टीव स्मिथ खेळत आहे 65-131 चेंडू, 6 चौकार, शॉन मार्श खेळत आहे 31-93 चेंडूस 4 चौकार
अवांतर 2
एकूण 89 षटकांत 3 बाद 244. 
बाद क्रम : 1-122, 2-135, 3-160. 
गोलंदाजी : जेम्स अँडरसन 21-8-43-1, स्टुअर्ट ब्रॉड 19-6-41-1, ख्रिस वोक्‍स 19-4-60-1, मोईन अली 6-0-35-0, टॉम करन 17-5-44-0, डेवीड मलान 7-1-20-0.

loading image