तिसऱ्या सामन्यास मालिकाही जिंकण्याची भारताला संधी 

वृत्तसंस्था
Sunday, 27 August 2017

पल्लीकल : कसोटी मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आता श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेवरही कब्जा करण्यासाठी विराटची 'टीम इंडिया' सज्ज झाली आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत रविवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासह मालिकाही जिंकणे भारतासाठी अवघड नसल्याचे चित्र आहे. 

पल्लीकल : कसोटी मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आता श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेवरही कब्जा करण्यासाठी विराटची 'टीम इंडिया' सज्ज झाली आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत रविवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासह मालिकाही जिंकणे भारतासाठी अवघड नसल्याचे चित्र आहे. 

भारताचा संघ श्रीलंकेत येण्यापूर्वी झिंबाब्वेने श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली होती. प्रमुख खेळाडूंच्या निवृत्तीनंतर श्रीलंकेची अवस्था बिकट झाली आहे. भारतासमोर आव्हान उभे करण्यासाठीही त्यांना शर्थ करावी लागत आहे. कोलंबो येथे झालेला दुसरा सामना जिंकण्याची त्यांना नामी संधी होती. मात्र, महेंद्रसिंह धोनी आणि भुवनेश्‍वर कुमार ही आठव्या विकेटची जोडी त्यांना फोडता आली नाही, परिणामी हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला होता. 

या मालिकेसाठी भारताने आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा या प्रमुख फिरकी गोलंदाजांना विश्रांती दिली आणि त्यांच्याऐवजी संधी देण्यात आलेले अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल हेसुद्धा श्रीलंकेच्या फलंदाजांना डोईजड होत आहेत. दुसऱ्या सामन्यातील फलंदाजीच्या क्रमवारीतील बदल भारताला महागात पडू शकले असते, पण धोनी आणि भुवनेश्‍वर यांनी कमान सांभाळली होती. 

त्या सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या शतकी सलामीनंतर विजय जवळपास निश्‍चित झालेला असताना केएल राहुल, केदार जाधव यांना अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर बढती दिल्यानंतर विराट स्वतः पाचव्या क्रमांकावर आला होता. उद्याच्या सामन्यात हेच बदल कायम राहाणार का विराट तिसऱ्या स्थानावर फलंदाजीस येणार, याची उत्सुकता असेल. अकिला धनंजयच्या गुगलीसमोर भारताची मधली फळी कोलमडली होती. त्यामुळे या सामन्यापूर्वी भारतीयांनी धनंजयच्या या गोलंदाजीचा चांगला अभ्यास केला असेल. 

पंड्याला विश्रांती देणार? 
विराट कोहलीच्या विश्‍वासातील अष्टपैलू हार्दिक पंड्याचा गुडघा दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना दुखावला होता, त्यामुळे सहावे षटक त्याला अर्धवट सोडावे लागले होते. त्यानंतर तो फलंदाजीस उतरला होता. भारताचा पुढील भरगच्च मोसम पाहता पंड्याला विश्रांती दिली जाण्याची शक्‍यता अधिक आहे. त्याच्याऐवजी मुंबईचा वेगवान गोलंदाज, जो आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमताही बाळगून आहे, त्या शार्दुल ठाकूरला प्राधान्य दिले जाऊ शकते. पल्लीकलची खेळपट्टी फिरकीस अनुकूल वाटल्यास कुलदीप यादवचाही विचार होऊ शकतो. हा एकमेव बदल वगळता भारतीय संघ कायम राहील. 

कामगिरी उंचावत नसताना श्रीलंकेसमोर आणखी एक प्रश्‍न उभा राहिला आहे. षटकांची गती न राखल्यामुळे कर्णधार उपुल थरांगाला दोन सामन्यांस मुकावे लागणार आहे, त्यामुळे चमारा कपुगेदारा श्रीलंकेचे नेतृत्व करणार आहे. थरांगाच्या अनुपस्थितीमुळे श्रीलंकेला फलंदाजीच्या क्रमवारीतही बदल करावे लागतील. 

नाणेफेकीतही साथ 
श्रीलंका दौऱ्यात नाणेफेकीतही विराट कोहली साथ मिळत आहे. सलग पाचव्यांदा नाणेफेकीचा कौल त्याच्या बाजूने लागला होता. एकदिवसीय मालिकेतील दोन्ही सामन्यांत त्याने प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिले होते. रविवारी कदाचित प्रथम फलंदाजीवर विश्‍वास दाखवला जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news cricket news India versus Sri Lanka Hardik Pandya