आता धोनी चौथ्या क्रमांकावरच योग्य : रोहित शर्मा 

पीटीआय
Thursday, 21 December 2017

कटक : 'महेंद्रसिंह धोनी आता ट्‌वेंटी-20 क्रिकेटमध्ये 'मिसफिट' आहे' असे मत मांडणाऱ्या क्रिकेटतज्ज्ञांना काल (बुधवार) धोनीने सणसणीत उत्तर दिले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्‌वेंटी-20 लढतीत धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येत 22 चेंडूंत 39 धावा फटकाविल्या आणि गोलंदाजीच्या वेळीही मोक्‍याच्या क्षणी कर्णधार रोहित शर्माला योग्य ते सल्ले देत संघातील उपयुक्तताही दाखवून दिली. त्यामुळेच रोहित शर्माने सामन्यानंतर धोनीचे तोंड भरून कौतुक केले. 

ट्‌वेंटी-20 क्रिकेटमध्ये धोनी सहसा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस येतो. मात्र, त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळणाऱ्या रोहितने 'चौथ्या क्रमांकासाठी धोनीच योग्य खेळाडू आहे' असे विधान केले. यावरून संघ व्यवस्थापनाच्या नियोजनाची दिशा लक्षात येऊ शकते. 

'धोनी म्हणजे खरंच कमाल आहे. त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविण्याचा निर्णय योग्य ठरला. त्याने आतापर्यंत संघाला कित्येक सामने जिंकून दिले आहेत. आता येत्या काळात धोनीसाठी चौथा क्रमांकाच सर्वोत्तम असेल, असे आम्हाला वाटते', असे मत रोहित शर्माने सामन्यानंतर व्यक्त केले. 

रोहित म्हणाला, 'गेल्या अनेक वर्षांपासून धोनी संघासाठी 'फिनिशर'ची जबाबदारी पार पाडत आहे. आता त्याच्यावरील हे दडपण कमी करण्याची गरज आहे. त्याने आता मुक्तपणे फलंदाजी केली पाहिजे.'' मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताकडे हार्दिक पांड्या आणि केदार जाधव यांच्यासारखे 'फिनिशर' तयार झाले आहेत. त्यामुळे धोनीकडे आता डाव नियंत्रित करण्याची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. 

युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे नेहमीच विकेट्‌स घेण्यासाठी उत्सुक असतात. संघाच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. फलंदाजीत सलामीला के. एल. राहुलला पाठविण्याचा निर्णयही योग्य ठरला. तो एकदिवसीय संघात नव्हता; पण ट्‌वेंटी-20 सामन्यात त्याने स्वत:ची उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविली. 
- रोहित शर्मा, भारताचा कर्णधार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news cricket news India versus Sri Lanka Rohit Sharma MS Dhoni