36 वर्षांचा धोनी 26 वर्षांच्या खेळाडूंपेक्षा जास्त 'फिट' : रवी शास्त्री 

पीटीआय
सोमवार, 25 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : 'महेंद्रसिंह धोनी 36 वर्षांचा असला, तरीही त्याच्यापेक्षा वयाने 10 वर्षे लहान असलेल्या खेळाडूंपेक्षा तो जास्त तंदुरुस्त आहे', असे मत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. 'सध्याच्या संघामध्ये धोनीची जागा कुणीही घेऊ शकत नाही' असेही शास्त्री म्हणाले. 

नवी दिल्ली : 'महेंद्रसिंह धोनी 36 वर्षांचा असला, तरीही त्याच्यापेक्षा वयाने 10 वर्षे लहान असलेल्या खेळाडूंपेक्षा तो जास्त तंदुरुस्त आहे', असे मत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. 'सध्याच्या संघामध्ये धोनीची जागा कुणीही घेऊ शकत नाही' असेही शास्त्री म्हणाले. 

गेल्या काही महिन्यांमध्ये धोनीची फलंदाजी फारशी बहरलेली नाही. अर्थात, त्याच्या यष्टिरक्षणावर याचा तीळमात्रही फरक पडलेला नाही. तरीही, फलंदाजीतील त्याच्या प्रत्येक अपयशानंतर 'धोनीने आता निवृत्त व्हायला हवे' असा सूर काही माजी खेळाडू आणि तज्ज्ञांकडून उमटत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या ट्‌वेंटी-20 मालिकेमध्ये निर्भेळ यश मिळविल्यानंतर शास्त्री यांनी धोनीच्या टीकाकारांचा समाचार घेतला. 

शास्त्री म्हणाले, "आम्ही मूर्ख नाही. मी गेली 30-40 वर्षे हा खेळ जवळून पाहत आहे. विराट कोहली संघात दाखल होऊनही आता दशकभराचा काळ होत आला आहे. या वयातही धोनी एखाद्या 26 वर्षांच्या खेळाडूला तंदुरुस्तीत सहज मागे टाकेल. धोनीवर जे टीका करतात, त्यांनी स्वत:ची 36 व्या वर्षी काय परिस्थिती होती हे आठवावे.'' 

यष्टिरक्षणामध्ये धोनीसारखे सातत्य आणि कौशल्य इतर कुणामध्येही नाही, असे शास्त्री यांनी ठासून सांगितले. निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनीही धोनीच्या संघातील स्थानाबद्दल ठाम उत्तर दिले होते. आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत धोनी हा संघाचा अविभाज्य भाग असेल, असे मत प्रसाद यांनी व्यक्त केले होते. 

धोनीसारखा खेळाडू भारतातच नव्हे, तर जगात मिळणे अवघड आहे. त्याच्यासारखे कौशल्य इतर कुणातही नाही. एकदिवसीय संघामध्ये धोनीची जागा घेऊ शकेल, असा एकही खेळाडू आजवर गवसलेला नाही. 
- रवी शास्त्री, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news cricket news Team India MS Dhoni Ravi Shastri