वूमेन्स इन ब्लू..! 

श्‍वेता शिंदे
सोमवार, 24 जुलै 2017

भारतीय महिला क्रिकेटच्या दृष्टीनं कालचा रविवारचा दिवस खूपच महत्त्वाचा होता. ऐतिहासिक लॉर्ड्सवर आपला संघ विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लढणार होता. तसा हा संघ लढलाही..! शेवटी पराभव स्वीकारावा लागला. पण या विजयापेक्षाही काही महत्त्वाची गोष्ट घडली... कधी नव्हे ते देशभरातील क्रिकेटरसिक हा सामना पाहण्यासाठी टीव्हीसमोर बसले होते. सचिन तेंडुलकरपासून फरहान अख्तरपर्यंत सगळे सेलिब्रेटी काल ट्विटरवर सामन्याविषयी ट्विट करत होते. अक्षयकुमार तर प्रत्यक्ष स्टेडियममध्ये उपस्थित होता. काल आपला संघ मैदानावर पराभूत झाला असला, तरीही देशातील महिला क्रिकेटच्या प्रगतीची पहिली लढाई जिंकला आहे. 'ई सकाळ'च्या वाचक श्वेता शिंदे यांनी याच वाटचालीवर आपले मत मांडले आहे.

तुमच्या आवडीच्या विषयावर तुम्हीही लिहू शकता..

मग लिहा लेख आणि पाठवा 'ई सकाळ'कडे webeditor@esakal.com या ई मेल आयडीवर. यात तुमचे संपूर्ण नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक आवर्जून नोंदवा..

महिला विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारणारा भारतीय संघ इंग्लंडकडून पराभूत झाला. आता सगळीकडून या पराभवाचं खापर त्यांच्यावर फोडणार की त्यांचं कौतुक करणार..? कौतुक यासाठी, की अंतिम सामना त्यांनी शर्थीने लढला.. पण या पराभवाने त्यांच्यावर 'फोकस' ठेवणारा मीडिया परत त्यांना 'अनफोकस' करणार.. यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत आपल्या संघाने चांगली कामगिरी केली. चार साखळी सामने जिंकून उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवून फायनलचं तिकीट नक्की केलं.. पण या पराभवाने कदाचित त्यांना पुन्हा तुलनेच्या गर्दीत उभं केलं.. 

चॅंपियन्स करंडक स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानकडून पराभूत झाला होता.. सगळा देश त्या पराभवाच्या धक्‍क्‍यात असताना महिला संघ विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला. पण त्यांची दखल घेतंय कोण..? आम्हाला तर दु:ख आहे 'भारत पाकिस्तानकडून हारला' याचं.. शेवटी 'पोरानं बापाला हरवलं' होतं ना..! महिला संघाने पाकिस्तानला हरविल्यानंतर मीडियाने त्यांच्यावर फोकस केलं. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला.. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाला हरविल्यानंतर 'त्यांनी पुरुष संघाच्या पराभवाचा बदला घेतला' अशीही चर्चा होऊ लागली. उद्या पुरुष संघाने विश्‍वकरंडक स्पर्धा जिंकली, तर 'त्यांनी महिला संघाच्या पराभवाचा बदला घेतला' असं म्हणणार का? नाही..! 

यानंतर महिला संघाला पुन्हा जिद्दीने मेहनत करावी लागेल. फार तर चार दिवस त्यांच्या खेळाचं कौतुक होईल. पण नंतर पुन्हा त्यांना स्वत:ला सिद्ध करून दाखवावंच लागेल. 'लेडी सचिन', 'लेडी सेहवाग' अशी तुलना करून त्यांचे कौतुक केले गेले. सुरवातीला तर मीडियाने महिला क्रिकेटकडे दुर्लक्षच केलं. फक्त मीडियातूनच नाही, तर सगळ्याच स्तरांतून याकडे दुर्लक्ष झालं. कारण त्याच वेळी पुरुष संघासाठीच्या प्रशिक्षक निवडीचे काम सगळ्यांना महत्त्वाचे वाटले. महिला संघाचा प्रशिक्षक कोण आहे, हे कदाचित अजूनही कुणालाही माहीत नसेल. 

महिला क्रिकेट संघ हा पुरुष संघापेक्षा बराच मागासलेला आहे. त्या महिला असूनही पुरुष संघापेक्षा त्यांच्याकडे कमी ग्लॅमर आहे.. पैसा तर तुटपुंजाच..! महिला संघाच्या ग्लॅमरविषयी बोलायचं झालं, तर मध्यंतरी एक जाहिरात पाहण्यात आली.. त्यात मिताली राज होती.. त्या जाहिरातीत मितालीच्या नावाखाली 'महिला संघाची कर्णधार' असा उल्लेख होता. असा उल्लेख कधी महेंद्रसिंह धोनी किंवा विराट कोहलीच्या नावाखाली दिसला नाही. त्यांना तशी गरजही भासत नाही. यांची नावं आज घराघरात पोचली आहेत. 

पुरुष संघ जिंकल्यानंतर त्यांना कोट्यवधी रुपये मिळतात. प्रत्येक राज्याकडून मिळणारे वेगळेच..! इकडे महिला संघाला भारत सरकारकडून 50 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले. कमी ग्लॅमर आणि मीडियाची उदासीनता, कमी प्रेक्षक याचा तर सतत सामना करावा लागतो. पुरुष संघासाठी अनेक राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार सरसावतात. 'आयपीएल'सारख्या स्पर्धा घेतल्या जातात. पण हेच सगळे महिला क्रिकेटविषयी अनुत्साही वाटतात. पुरुष संघापेक्षा प्रत्येक बाबतीत असलेल्या कमीपणाकडे साफ दुर्लक्ष करत त्यांनी मेहनतीच्या, जिद्दीच्या बळावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. 

2005 मध्ये झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेतही भारतीय संघाने अशीच कामगिरी केली होती. अखेरच्या सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला नमवून त्यांनी स्वत:च्या पराभवाचा बदला घेतला.. 'स्त्रीने जर ठरवलं, तर ती स्वत:च्या बळावर काहीही करू शकते..!' आता अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा बदलाही त्या इंग्लंडकडून घेतीलच.. 2005 मधील त्या संघातील आता फक्त मिताली राज आणि झूलन गोस्वामी या दोघीच सध्याच्या संघात आहेत. बाकी सगळ्या नवीन आहेत..! या सगळ्या नव्या-जुन्या खेळाडूंचा योग्य ताळमेळ साधत या संघाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं.. असं म्हणतात.. 'बायकांचं कधी जमत नाही आणि जमलं तर खूप जमतं..' त्यांच्यातही मतभेद असतील; पण त्यांचे मतभेद कधी समोर आले नाहीत. 

या स्पर्धेमध्ये स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, पूनम राऊत, शिखा पांडे यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. वेस्ट इंडिजविरुद्ध स्मृती, ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरमनप्रीत अशा एकतर्फी लढती त्यांनी जिंकल्या. या सगळ्या देशातल्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या, प्रत्येकीचा वर्ग वेगळा, परिस्थिती वेगळी, समाज वेगळा.. पण या सगळ्या अडथळ्यांना त्यांनी मागे टाकले. 'मुलगी क्रिकेट खेळते' हे अजूनही काही ठिकाणी मान्य नाही. विरोध यांनाही झाला असेल. पण त्या विरोधाला झुगारून पुढे गेल्या. सततच होत असलेल्या दुर्लक्षाचा त्यांनी स्वत:च्या खेळावर काडीचाही परिणाम होऊ दिला नाही. 

गेल्या वर्षी भारतीय संघाने आशिया करंडक जिंकला. त्यावेळी मिताली राजने मीडियालाच उत्तर दिलं होतं.. 'एकवेळ अशी होती, की मीडियाने आमच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं होतं. आम्ही आशिया करंडक जिंकल्यानंतर मीडियाला जाग आली. महिला क्रिकेट संघ अस्तित्वात असल्याची जाणीव त्यावेळी झाली. भारतासारख्या 'चूल आणि मूल' एवढीच मर्यादा आखून दिलेल्या देशातील महिला निळी जर्सी घालून हातात बॅट घेऊन समोरच्या संघाच्या नाकीनऊ आणतात.. बॉल घेऊन जागेवरच गारद करतात.. या आहेत समाजवादी भारतातील महिला..!' 

पुरुष संघापेक्षा कमतरता असली, तरीही त्या सरस आहेत. पराभवाला कसं उत्तर द्यायचं, हे त्यांना माहीत आहे. अंतिम फेरीतील प्रवेशानंतर वाढलेला आत्मविश्‍वास या पराभवाने थोडा कमी झाला असेल; पण संपला नसेल. इथपर्यंतच्या मेहनतीचं, खेळाचं होणारं कौतुक यासोबतच त्यांना आता खऱ्या अर्थाने पाठिंब्याची गरज आहे. पुरुष खेळाडूंशी तुलना न करता त्यांना मिळणाऱ्या प्रसिद्धीची, त्यांच्याएवढ्या ग्लॅमरची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुली क्रिकेटकडे यशस्वी करिअर म्हणून पाहतील. त्या हरल्या किंवा जिंकल्या, तरीही महिला क्रिकेट असल्याची जाणीव खूप मोठ्या स्तरावर जाऊन करून दिली आहे. त्यांचा खेळ बघून एकच वाक्‍य म्हणता येईल.. 'खूप दिवसांनी क्रिकेट बघण्याची मजा आली.. वेल प्लेड गर्ल्स..! तुम्ही जाणीव आणि अभिमान करून दिला.. 'वूमेन्स इन ब्ल्यू' असण्याचा..!

Web Title: marathi news sports news cricket Women's World Cup