esakal | दक्षिण आफ्रिकेकडे भरभक्कम आघाडी; तरीही बचावात्मक खेळ 
sakal

बोलून बातमी शोधा

दक्षिण आफ्रिकेकडे भरभक्कम आघाडी; तरीही बचावात्मक खेळ 

दक्षिण आफ्रिकेकडे भरभक्कम आघाडी; तरीही बचावात्मक खेळ 

sakal_logo
By
सुनंदन लेले

सेंच्युरियन : दुसऱ्या कसोटी क्रिकेटच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर स्वत:ची बाजू भक्कम करण्याचा विचार करत खेळ केला. एबी डिव्हिलियर्स मैदानावर असेपर्यंत धावांचा ओघ चालू होता. महंमद शमीने डिव्हिलियर्ससह तिघांना बाद करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या मनात शंका निर्माण केली. त्यानंतर यजमान संघाने सामना जिंकण्यापेक्षा अनिर्णित राखण्याचा विचार आधी केला, असेच जाणवत होते. दुसऱ्या डावातील आघाडी 200 हून अधिक झाल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी करण्याचा विचार थोडा लांबच ठेवला. चौथ्या दिवशी चहापानाला खेळ थांबला, तेव्हा दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 7 बाद 230 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडे एकूण 258 धावांची आघाडी होता. 

जगातील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत डिव्हिलियर्सचे नाव आदराने का घेतले जाते, हे सेंच्युरियन कसोटीत दिसून आले. बाकीचे फलंदाज लय शोधत धडपडत असतानाही डिव्हिलियर्स सहज फटकेबाजी करत होता. डीन एल्गरसोबत त्याने सकाळच्या सत्रात 141 धावांची मस्त भागीदारी केली. मिळालेल्या जीवदानांचा फायदा घेत एल्गरने अर्धशतक केले. महंमद शमीने आक्रमक मारा करून डिव्हिलियर्सला 80, एल्गरला 61 तर क्विंटन डिकॉकला 12 धावांवर बाद केले. 

उपाहारानंतरचा खेळ रटाळ झाला. कर्णधार फाफ डू प्लेसिसने फिलॅंडरसह फलंदाजी करताना एकदम सावध पवित्रा घेतला. उपहारानंतरच्या 27 षटकांत केवळ 54 धावा काढल्या गेल्या. 70 षटके जुन्या चेंडूवर पूर्ण ताकद लावून गोलंदाजी करत ईशांत शर्माने फिलॅंडर आणि केशव महाराजला बाद केले. 

चहापानाला खेळ थांबला, तेव्हा फाफ डू प्लेसिस 122 चेंडूंत 37 धावा करून खेळत होता.

loading image