क्रिकेट: दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी; राहुल, पार्थिव, ईशांत भारतीय संघात 

वृत्तसंस्था
Saturday, 13 January 2018

सेंच्युरियन : भारताविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. मात्र, भरवशाचा फलंदाज अजिंक्‍य रहाणेला संघात स्थान मिळू शकले नाही. 

सेंच्युरियन : भारताविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. मात्र, भरवशाचा फलंदाज अजिंक्‍य रहाणेला संघात स्थान मिळू शकले नाही. 

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला या सामन्यात विजय आवश्‍यकच आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघात तीन बदल केले. धावांसाठी झगडणाऱ्या शिखर धवनला संघाबाहेर जावे लागले असून त्याच्या जागी के. एल. राहुल याचा समावेश झाला आहे. पहिल्या सामन्यात दुखापत झालेला यष्टिरक्षक वृद्धिमान साहा अद्याप पूर्ण तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे त्याच्या जागी पार्थिव पटेलला संघात स्थान मिळाले आहे. भारतीय संघातील तीन बदलांपैकी सर्वांत आश्‍चर्यकारक निर्णय म्हणजे पहिल्या सामन्यात भेदक गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्‍वर कुमारला संघात स्थान मिळालेले नाही. त्याच्या जागी ईशांत शर्माचे पुनरागमन झाले आहे. 

परदेशातील कसोटींमध्ये भरवशाचा फलंदाज ठरलेल्या अजिंक्‍य रहाणेला मात्र या सामन्यासाठीही संघात जागा मिळाली नाही. संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माला आणखी एक संधी देण्यात आली आहे. 

दक्षिण आफ्रिकेच्या संघातही दुखापतीमुळे एक बदल करावा लागला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन मालिकेतूनच बाहेर पडला असल्याने त्याच्या जागी ल्युंगी एन्गिडीला पदार्पणाची संधी मिळाली आहे. एन्गिडी 21 वर्षांचा असून यापूर्वी त्याने दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघाकडून प्रभावी कामगिरी केली आहे. सातत्याने 140 किलोमीटर प्रतितास वेगाने अचूक मारा करण्याच्या क्षमतेमुळे त्याला दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळाले आहे. 

भारतीय संघ: 
के. एल. राहुल, मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, पार्थिव पटेल (यष्टिरक्षक), आर. आश्‍विन, महंमद शमी, जसप्रित बुमराह, ईशांत शर्मा. 

दक्षिण आफ्रिकेचा संघ: 
डीन एल्गर, एडन मार्कराम, हाशिम आमला, एबी डिव्हिलिअर्स, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), क्विंटन डिकॉक (यष्टिरक्षक), व्हरनॉन फिलॅंडर, ल्युंगी एन्गिडी, केशव महाराज, कागिसो रबाडा, मॉर्ने मॉर्केल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news India versus South Africa Virat Kohli KL Rahul Ajinkya Rahane