विराट, शास्त्रींचे बोट सोड!

Wednesday, 17 January 2018

विराट फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांचे खच्चीकरण करणाऱ्या विराट कोहलीला आता आपण भारतात खेळत नसून परदेशात कर्णधारपद भूषवित आहोत याची जाणीव होणे गरजेचे आहे. याला कारणही तसेच आहे, हे म्हणजे आतापर्यंत मायदेशात विजयाची चटक लागलेल्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत जळत्या निखाऱ्यांवरून चालावे लागत आहे. कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री जोडी हा यशस्वी असल्याचा फॉर्म्युला येथे सपशेल फेल होताना दिसत आहे. अगदी अनिल कुंबळेला हटविण्यापासून ते संघ निवडण्याच्या प्रक्रियेपर्यंत विराटचे शास्त्रीवर अवंलबून असणे संघासाठी धोकादायक असल्याचे दक्षिण आफ्रिकेत स्पष्ट दिसत आहे.

विराट फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांचे खच्चीकरण करणाऱ्या विराट कोहलीला आता आपण भारतात खेळत नसून परदेशात कर्णधारपद भूषवित आहोत याची जाणीव होणे गरजेचे आहे. याला कारणही तसेच आहे, हे म्हणजे आतापर्यंत मायदेशात विजयाची चटक लागलेल्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत जळत्या निखाऱ्यांवरून चालावे लागत आहे. कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री जोडी हा यशस्वी असल्याचा फॉर्म्युला येथे सपशेल फेल होताना दिसत आहे. अगदी अनिल कुंबळेला हटविण्यापासून ते संघ निवडण्याच्या प्रक्रियेपर्यंत विराटचे शास्त्रीवर अवंलबून असणे संघासाठी धोकादायक असल्याचे दक्षिण आफ्रिकेत स्पष्ट दिसत आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने केप टाऊन कसोटीत सपाटून मार खावा लागल्यानंतर सेंच्युरियन कसोटीत पुनरागमनाची संधी होती. पण, ती संधीही भारतीय संघाने दवडल्याचे स्पष्ट दिसत आहे. पहिल्या कसोटीत अपयशी ठरल्यानंतर शिखर धवनला वगळणाऱ्या संघ व्यवस्थापनाने चांगली कामगिरी करूनही भुवनेश्वर कुमारला वगळले. संघ व्यवस्थापन म्हणजेच प्रशिक्षक अशी स्थिती सध्या झाल्याचे दिसत आहे. भुवनेश्वरला वगळण्यावरून माजी क्रिकेटपटूंनी विराटच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण केले. अगदी विराटने स्वतःची कामगिरी खराब झाली तर पुढच्या कसोटीत खेळू नये, असा सल्लाही वीरेंद्र सेहवागने दिला. पण, असे मोठे निर्णय घेताना एकटा कर्णधार जबाबदार असतो असे नाही. पण, त्याला प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनही तितकेच जबाबदार आहे. आतापर्यंत प्रशिक्षक कर्णधाराची आणि कर्णधार प्रशिक्षकाची वाहवा करण्यात व्यस्त होते. येथे येऊन दोष कोणाला द्यायचा यावर चिंतन करण्यात येत आहे.

विराट आणि शास्त्री यांच्यातील चांगले संबंध क्रिकेट जगताला परिचीत आहेत. याचा बळी अनिल कुंबळेसारखा महान गोलंदाज ठरला होता. कुंबळेचे अचानक प्रशिक्षकपदावरून जाणे आणि प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज करायला सांगणे. शास्त्रींनी अर्ज करणे अन् त्यांची निवड होणे हे जवळपास ठरलेलेच होते. विराटची ही खेळी यशस्वी ठरली असती तर आता प्रशिक्षकाचे किती ऐकावे आणि किती नाही, हे विराट न समजण्याइतका छोटा राहिलेला नाही. शतकांचे अर्धशतक करणारा कोहली जवळपास सर्व देशांत खेळलेला आहे. खेळपट्टीचा अंदाज घेण्याएवढी क्षमता त्याच्यात आहे. यापूर्वी भारतीय संघ परदेशात पराभूत झाला असे नाही. पण, परदेशातील खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करतील असे खेळाडू संघात असूनही त्यांना संघाबाहेर ठेवणे झाले नव्हते. पूर्वी खेळाडूंच्या कामगिरीवर चर्चा होत होती आणि संघ निवडीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

रहाणेला वगळणे चूकच
परदेशात खडतर खेळपट्ट्यांवर शतके झळकाविणारा अजिंक्य रहाणे सलग दुसऱ्या कसोटीतही संघाबाहेर आहे. पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही सपाट खेळपट्ट्यांवर खेळणाऱ्या रोहित शर्माला संधी देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेच्याच कर्णधार फाफ डु प्लेसिसनेच याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. परदेशातील उसळी घेणाऱ्या चेंडूवर चांगली कामगिरी करणाऱ्या रहाणेऐवजी भारतातील खेळपट्ट्यांवर धावांचा रतीब ओतणाऱ्या रोहितला सतत संधी देणे हे कितपत योग्य आहे. कर्णधार हा प्रशिक्षकांच्या निर्णयावर किती अवलंबून आहे, हे यातून स्पष्ट होते. अनेक माजी क्रिकेटपटू रहाणेचा समावेश नसल्याबाबत प्रश्न उपस्थित करत असताना कर्णधार आणि प्रशिक्षक आपल्या निर्णयावर ठाम असल्याने संघाची ही दुरावस्था पहायला मिळत आहे.

यावर्षी भारतीय संघाचे खडतर दौरे
गेल्या वर्षी एकामागून एक मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाला यावर्षी मात्र दक्षिण आफ्रिकानंतर इंग्लंड आणि वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियामध्ये खेळावे लागणार आहे. अनेक युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाला परदेशात खेळण्याचा अनुभव खूप कमी आहे. यामुळेच आता दक्षिण आफ्रिकेतील पराभवातून धडा घेऊन कर्णधार आणि प्रशिक्षकाने भविष्याचा विचार करायला हवा. मायदेशातील कामगिरीच्या जोरावर परदेशात खेळताना संघात स्थान देण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी विराटने स्वतः निर्णय घेऊन संघाची बांधणी केली पाहिजे. 

सध्या दक्षिण आफ्रिकेत खेळत असलेल्या भारतीय संघाचा शास्त्रीऐवजी कुंबळे प्रशिक्षक असता तर यातील किती खेळाडू संघाबाहेर असते हा प्रश्न आहे. सतत प्रशिक्षकाचे बोट धरून निर्णय घेणाऱ्या विराटने आता शास्त्रींचे बोट सोडले पाहिजे. ज्याप्रमाणे तो मैदानात बाजी मारत असतो, तसेच त्याने संघ निवड म्हणा की खेळाडूंशी असलेल्या नात्यांबाबत स्वयंभू व्हायला हवे. तरच तुमची ओळख खेळाडू घडविणारा सौरभ गांगुली म्हणून होऊ शकते आणि क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात तुम्ही कायम राहता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news India versus South Africa Virat Kohli Ravi Shastri Sachin Nikam