शिखर धवन नेहमीच 'बळीचा बकरा' असतो : गावसकर

पीटीआय
Saturday, 13 January 2018

सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील भारतीय संघाच्या निवडीवर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाच्या निवडीवर अनेक माजी क्रिकेटपटूंनीही टीकेचा सूर आळवला आहे. 

सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील भारतीय संघाच्या निवडीवर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाच्या निवडीवर अनेक माजी क्रिकेटपटूंनीही टीकेचा सूर आळवला आहे. 

तीन सामन्यांच्या मालिकेत भारत 0-1 अशा पिछाडीवर आहे. पहिल्या सामन्यात भेदक गोलंदाजी केलेल्या भुवनेश्‍वर कुमारला संघाबाहेर बसवून ईशांत शर्माला संघात स्थान देण्यात आले. शिवाय, चाचपडणाऱ्या शिखर धवनऐवजी के. एल. राहुलला स्थान मिळाले. यष्टिरक्षक वृद्धिमान साहाला दुखापत झाल्यामुळे पार्थिव पटेलला संधी मिळाली. यात रोहित शर्माला प्राधान्य देत कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेला संघाबाहेरच ठेवल्यानेही अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

गावसकर म्हणाले, "शिखर धवन हा नेहमीच बळीचा बकरा ठरतो. एखाद्या डावात तो अपयशी ठरला, तर त्याला लगेच संघाबाहेर काढले जाते. तसेच, भुवनेश्‍वरच्या जागी ईशांत शर्माला स्थान कसे काय मिळते, हादेखील एक प्रश्‍नच आहे. भुवनेश्‍वरने पहिल्या कसोटीत पहिल्याच दिवशी तीन बळी मिळविले होते. ईशांतला संघात स्थान द्यायचेच होते, तर महंमद शमी किंवा जसप्रित बुमराहच्या जागी त्याला संधी देता आली असती; पण भुवनेश्‍वरला वगळण्याच्या निर्णयामागील धोरण कळण्यापलीकडचे आहे.'' 

दुसऱ्या कसोटीमध्येही दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. ईशांत, बुमराह आणि शमी या वेगवान गोलंदाजांना या डावात पहिल्या दोन सत्रांमध्ये छाप पाडता आली नाही. फिरकी गोलंदाज आर. आश्‍विननेच दोन्ही सलामीवीरांना बाद करत भारताला माफक यश मिळवून दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news India versus South Africa Virat Kohli Sunil Gavaskar