फलंदाजांच्या क्रमवारीत विराटची दुस-या क्रमांकावर झेप

वृत्तसंस्था
Thursday, 7 December 2017

फलंदाजीत भन्नाट सूर गवसलेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतील कामगिरीमुळे कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत तीन स्थानांची झेप घेत दुसरा क्रमांक पटकाविला.

दुबई : फलंदाजीत भन्नाट सूर गवसलेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतील कामगिरीमुळे कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत तीन स्थानांची झेप घेत दुसरा क्रमांक पटकाविला. एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० मधील फलंदाजांच्या क्रमवारीत विराट अव्वल स्थानी आहे.

क्रिकेटमधील तीनही प्रकारांमध्ये एकाच वेळी अव्वल स्थान पटकाविण्याची किमया यापूर्वी अाॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने केली होती. आता कोहलीलाही अशी कामगिरी करण्याची संधी आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या तिस-या कसोटीत कोहलीने पहिल्या डावात 243 धावांची खेळी केली होती. दुस-या डावात त्याने 50 धावा केल्या होत्या. तीन सामन्यांच्या या मालिकेत कोहलीने एकूण 610 धावा फटकाविल्या. या कामगिरीमुळे त्याचे क्रमवारीतील स्थान सुधारले.

ही मालिका सुरू होण्यापूर्वी कोहली सहाव्या क्रमांकावर होता. मात्र, आता त्याने डेव्हिड वाॅर्नर, चेतेश्वर पुजारा, केन विल्यमसन आणि ज्यो रूट यांना क्रमवारीत मागे टाकून दुसरे स्थान मिळविले. अव्वल स्थानी आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आहे. स्मिथ आणि कोहलीमध्ये 45 गुणांचा फरक आहे.

सांघिक क्रमवारीमध्ये भारताचा एक गुण कमी झाला असला, तरीही प्रथम क्रमांक कायम राहीला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news India versus Sri Lanka Virat Kohli ICC Rankings Steve Smith The Ashes