धोनी-रैना 'चेन्नई'चेच; आश्‍विनला संधी मिळणार का? 

पीटीआय
Saturday, 23 December 2017

चेन्नई : दोन वर्षांच्या बंदीनंतर 'आयपीएल'मध्ये पुनरागमन करत असलेल्या 'चेन्नई सुपर किंग्ज'ने 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीला पुन्हा संघात घेण्याचे निश्‍चित केले आहे. धोनीसह सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा हे 'चेन्नई'चे प्रमुख खेळाडूही संघात परतणार आहेत. मात्र, अनुभवी फिरकी गोलंदाज आर. आश्‍विनच्या निवडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. 

सामना निकालनिश्‍चिती प्रकरणी चेन्नई सुपर किंग्ज संघावर दोन वर्षांची बंदी लादण्यात आली होती. आता आगामी 'आयपीएल'पासून चेन्नईचा संघ स्पर्धेत पुनरागमन करणार आहे. चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांसाठी खेळाडूंच्या लिलावापूर्वी 'राईट टू मॅच'चा पर्याय देण्यात आला आहे. बंदीपूर्वी संघात असलेल्या खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची विनंती या दोन संघांनी केली होती. 

'संघ व्यवस्थापनाने अद्याप संघातील तीन प्रमुख खेळाडूंची अंतिम यादी प्रशासनाकडे सोपविलेली नाही. पण यात धोनीचे नाव असेल, हे स्वतंत्रपणे सांगण्याची गरज नाही. रैनाचाही यात समावेश असेलच. तिसरा खेळाडू म्हणून जडेजाला सर्वाधिक पसंती मिळू शकते' असे चेन्नई सुपर किंग्ज संघ व्यवस्थापनातील सूत्रांनी सांगितले. आश्‍विनलाही पुन्हा संधी मिळेल अथवा नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही, अशी माहितीही मिळत आहे. 

गेल्या काही काळापासून आश्‍विन भारताच्या मर्यादित क्रिकेटच्या संघातून बाहेर आहे. त्याच्याकडे आता कसोटीतील गोलंदाज म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे 'आयपीएल'मध्ये आश्‍विनला किती संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. आश्‍विनऐवजी तरुण फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर किंवा वेस्ट इंडीजचा ड्‌वेन ब्राव्हो यांना संधी दिली जाऊ शकते. 

'आयपीएल'मधील फ्रॅंचायझींना गेल्या संघातील पाच खेळाडू कायम राखण्याची मुभा आहे. त्यासाठी ही यादी 4 जानेवारीपर्यंत 'आयपीएल' प्रशासनाकडे पाठविणे आवश्‍यक आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news IPL News MS Dhoni Chennai Super Kings