सध्याचा भारतीय संघ अचाट आहे.. : रवी शास्त्री 

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

कँडी : 'भारतीय संघ सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्याने कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिकेदरम्यान मिळालेली ही विश्रांती महत्त्वाची आहे' असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. कँडीमधील कसोटी सामना तिसऱ्याच दिवशी संपल्याने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी भारतीय खेळाडूंना पाच दिवस विश्रांती घेण्याची संधी मिळाली. 

कँडी : 'भारतीय संघ सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्याने कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिकेदरम्यान मिळालेली ही विश्रांती महत्त्वाची आहे' असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. कँडीमधील कसोटी सामना तिसऱ्याच दिवशी संपल्याने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी भारतीय खेळाडूंना पाच दिवस विश्रांती घेण्याची संधी मिळाली. 

रवी शास्त्री म्हणाले, "15 ऑगस्टचा दिवस आम्हा सर्वांसाठी मोलाचा होता. एकत्र जमून ध्वजारोहण करण्याचा विचार आम्ही पक्का केला होता. आम्ही राहत असल्याने 'अर्ल्स रिजन्सी' हॉटेलचे आवार झकास आहेच; शिवाय ध्वजारोहण करण्यासाठी जागाही बरोबर मिळाली. लष्करातील माजी अधिकारी भारतीय संघाचे सुरक्षा अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. योग्य प्रकारे ध्वजारोहण कसे करता येईल, याची आखणी त्यांनी केली. सकाळी सगळे आवरून आवारात जमलो आणि ध्वजारोहण केले. खेळाडू खरंच प्रेरित झाले होते त्या समारंभाने..!'' 

यावेळी शास्त्री यांनी भारतीय संघातील खेळाडूंचेही तोंड भरून कौतुक केले. "खरंच सांगतो.. हा संघ अचाट आहे. सगळेच खेळाडू जवळपास एका वयोगटातील आहेत. त्यामुळे सगळ्यांमध्ये दोस्ती आहे. मला वाटतं, की दोस्तीचा हाच धागा या संघाला आणखी मोठी कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देईल. संघ सतत खेळीमेळीच्या वातावरणात राहतो की नाही, हेच खरं तर प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाचे काम असते. ही मुलं मेहनत करण्यात अजिबात कमी पडत नाहीत. सगळेजण जिमच्या सेशनला तर इतक्‍या कमाल उत्साहाने जातात, की पाहून आनंद होतो.. मेहनत करण्याच्या बाबतीत किंवा सरावातील गांभीर्याबाबत कुणालाही काहीही बोलावे लागत नाही, इतकी स्वयंशिस्त सर्वजण पाळतात. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेची कार्यपद्धती इतकी जबरदस्त आहे, की त्यांना बघून सगळे आपला मेहनतीचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न करतात. जिम असो वा पॅव्हेलियन, मैदान असो वा संघाच्या बैठकीची खोली.. सगळीकडे वातावरण सकारात्मक ठेवले, की मग आपोआप चांगल्या गोष्टी घडतात,'' असे रवी शास्त्री म्हणाले. 

'कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षक गर्दी करत नाहीत' याविषयी विराट किंवा शास्त्री फारसे काही बोलत नाहीत. "दोन संघांत जबरदस्त लढत असेल, तर प्रेक्षक का नाही येणार..? आम्ही आमच्या बाजूने प्रत्येक सामन्याला सर्वोत्तम क्रिकेट खेळायचे ध्येय ठेवत मैदानात उतरतो. प्रतिस्पर्धी संघाने आम्हाला टक्कर दिलेली आवडेल. कारण त्यातूनच मस्त क्रिकेट जन्माला येत असते. पण आमच्या हातात जे आहे, तेच आम्ही करणार ना..'' असे त्यांचे उत्तर आहे. 

श्रीलंकेतील तीनही कसोटी सामन्यांकडे स्थानिक प्रेक्षकांनी पाठ फिरविली. श्रीलंकेच्या संघाच्या दशेचे हे चित्र आहे. एकदिवसीय सामन्यांसाठी गर्दी होईल; पण कसोटी क्रिकेटचे भवितव्य चांगली लक्षणे दाखवत नाही, हे उघडपणे बोलायला सध्याचे खेळाडू जरा टाळत आहेत. भारतीय संघ आता थेट डिसेंबरमध्येच कसोटी खेळणाऱ्‌ आहे. तेही याच कमकुवत श्रीलंकन संघाविरुद्ध. भारतीय कसोटी संघाची खरी सत्वपरीक्षा 2018 च्या सुरवातीपासून पाहिली जाणार आहे. जानेवारीमध्ये भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे आणि 'आयपीएल' संपल्यानंतर इंग्लंडविरुद्ध प्रतिष्ठेची मालिका होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news Team India BCCI Ravi Shastr Virat Kohli Ajinkya Rahane