ऑस्ट्रेलियाच्या 'मायदेशात' भारतासच जास्त पाठिंबा

शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

तौरंगा (न्यूझीलंड) : बहरात असलेला भारत आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्नशील असलेले ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील विजेतेपदाची अंतिम लढत होईल. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या मायदेशातील या अंतिम लढतीवेळी भारतीय संघासच जास्त पाठिंबा लाभणार आहे. 

तौरंगा (न्यूझीलंड) : बहरात असलेला भारत आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्नशील असलेले ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील विजेतेपदाची अंतिम लढत होईल. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या मायदेशातील या अंतिम लढतीवेळी भारतीय संघासच जास्त पाठिंबा लाभणार आहे. 

ऑस्ट्रेलियास जणू आपल्या दुसऱ्या मायदेशात खेळण्याची संधी लाभणार आहे; पण त्यानंतरही त्यांना अंतिम लढतीत पुरेसा पाठिंबा नसेल. ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त त्यांना कोणी प्रोत्साहित करण्याची शक्‍यता कमी आहे. त्याचवेळी त्यांना आपण भारतात खेळतो आहे की काय, असे वाटेल. तौरंगाला प्रतिमोहाली म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या ठिकाणी चार हजार पंजाबी राहतात. ते भारतीय संघाला प्रोत्साहित करण्यास उत्सुक आहेत. 

प्रतिस्पर्धी संघांचा सामन्याच्या आदल्या दिवशी सराव झाला, त्या वेळी भारतीय संघाचा सराव पाहण्यासाठीच गर्दी होती. तौरंगा हे येथील चांगल्या हवामानामुळे निवृत्त व्यक्तींचे शहर झाले आहे. कार्यरत दिसणाऱ्या व्यक्तीत पंजाबींचे प्रमाण खूप आहे. त्यातील अनेक जण फळ बागायतदार आहेत. आता आपल्या कर्मभूमीतील भारताच्या कुमार संघाचे जगज्जेतेपद साजरे करण्याचे त्यांना वेध लागले आहेत. त्यातच शुभम गिल यशस्वी होत असल्यामुळे ते जास्तच खूश आहेत. 

सर्वच अनिवासी भारतीयांचा भारतीय संघाला पाठिंबा नसेल. ऑस्ट्रेलिया संघातील जेसन सांघा आणि परम उप्पल हे भारतीय वंशाचे खेळाडू आहेत, हे विसरू नका याची जाणीव करून दिली जाते. अर्थात हा अपवाद आहे. तौरंगातील अनेक भारतीय ढोल-ताशांच्या गजरात स्टेडियमवर गर्दी करणार हे नक्की. त्यामुळेच आठ हजार क्षमतेचे स्टेडियम निम्म्याहून जास्त भरणार, याची संयोजकांना खात्री आहे. 

पृथ्वी शॉ आणि त्याच्या सहकाऱ्यांना भारतीय वंशाच्या चाहत्यांचाच पाठिंबा लाभणार नाही, तर किवीही पाठिंबा देतील. न्यूझीलंडवासीयांची पहिली पसंती कायम त्यांच्या संघास असते. त्यानंतर जे कोणी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतात त्यांना असते. आम्ही फायनलमध्ये नाही, त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणाऱ्या भारतास आमची साथ असणार, असे स्थानिक क्रिकेटप्रेमी सांगतात.