यशाचा क्षण मोठाच; अजून बरीच मजल बाकी : द्रविड 

वृत्तसंस्था
Sunday, 4 February 2018

माऊंट मौनगानुई : खेळाडू तसेच कर्णधार असतानासुद्धा प्रकाशझोतापासून दूर राहिलेल्या राहुल द्रविड यांनी कारकिर्दीत प्रथमच जगज्जेतेपदाचा बहुमान मिळाल्यानंतरही मितभाषी स्वभावास साजेशी प्रतिक्रिया व्यक्त केली. युवा संघासाठी हा क्षण मोठाच आहे, असे सांगतानाच त्यांनी हेच यश त्यांच्या कारकिर्दीचे ठळक वैशिष्ट्य बनू नये. त्यांना अजूनही बरीच मजल मारायची आहे, असेही त्याच स्वरात नमूद केले. 

सामन्यानंतर टीव्ही समालोचक व न्यूझीलंडचे माजी खेळाडू सायमन डुल यांनी द्रविड यांची मुलाखत घेतली. मुख्य प्रशिक्षक या नात्याने द्रविड यांचा संघाच्या यशात मोलाचा वाटा आहे. युवा खेळाडू जल्लोष करीत असले तरी द्रविड शांतपणे भाष्य करीत होते.

नजीकच्या भविष्यात युवा खेळाडू आणखी मोठ्या क्षणाचे मानकरी ठरावेत, हीच सदिछा त्यांनी व्यक्त केली. द्रविड यांना 2016 मधील स्पर्धेत यशाने थोडक्‍यात हुलकावणी दिली होती. या वेळी यशाला गवसणी घातल्यानंतरही ते हवेत गेले नव्हते. 
45 वर्षांचे द्रविड म्हणाले, की मला मुलांचा खरोखरच फार अभिमान वाटतो. त्यांनी तसेच सपोर्ट स्टाफने कसून प्रयत्न केले. गेले 14 महिने आम्ही सराव करीत होतो. हे प्रयत्न सनसनाटी असेच आहेत. 

द्रविड यांनी सपोर्ट स्टाफमधील सहकाऱ्यांचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, की माझ्याकडेच सगळे लक्ष जाते; पण खरे तर आमच्याकडील दर्जेदार सपोर्ट स्टाफमुळे हे यश साकार झाले. आम्ही आठ जण मिळून गेले 14 महिने बरेच प्रयत्न करीत होतो. या सपोर्ट स्टाफचा घटक असण्याचा मला अभिमान वाटतो. मुलांसाठी जे सर्वोत्तम आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न होता. त्याच्या जोरावर मुलांनी मैदानावर कामगिरी करावी, अशी अपेक्षा होती आणि या स्पर्धेत त्यांनी नक्कीच ती पूर्ण केली. 

ही मुले या यशास खरोखरच सर्वार्थाने पात्र आहेत. या आठवणी त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरतील. अर्थात याच आठवणी त्यांच्या कारकिर्दीची ओळख बनू नयेत अशी आशा आहे. हे खेळाडू पुढे जाऊन कारकिर्दीत आणखी उत्तुंग क्षणाचे साक्षीदार बनावेत आणि त्यांच्या आठवणी आणखी सुखद ठराव्यात. 
- राहुल द्रविड

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Under 19 Cricket World Cup Final India versus Australia Rahul Dravid