कोहलीचा धावांचा पाऊस; भारत 6 बाद 303 

Wednesday, 7 February 2018

केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनमध्ये पाण्याचा पाऊस पडत नसला, तरीही विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. एकदिवसीय क्रिकेटमधील 34 वे शतक झळकाविताना कोहलीने भारतीय फलंदाचीची धुरा समर्थपणे सांभाळली. कडक उन्हात प्रथम फलंदाजी करताना भारताने सहा गडी गमावून 303 धावा केल्या. कोहली 160 धावा करून नाबाद राहिला. सलामीवीर शिखर धवनने 76 धावा करत कोहलीला चांगली साथ दिली. 

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात यष्टिरक्षक क्‍लासेन आणि वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली. कागिसो रबाडाने पहिल्याच षटकात रोहित शर्माला शून्यावर बाद केले. 

सुरुवातीला विकेट थोडी साथ देत असल्याने रबाडाने विराट कोहलीला चांगलीच खुन्नस देत गोलंदाजी केली. नेहमी आक्रमक देहबोली असणाऱ्या कोहलीने प्रगल्भता दाखवत शांत डोक्‍याने खेळत जम बसवला. नजर बसल्यानंतर कोहली - शिखर धवन जोडीने गोलंदाजांचा समाचार घेणे चालू केले. शिखर धवन जास्त ताकदवान फटके मारत होता. 

या मैदानाची सीमारेषा लांब असल्याने मोकळ्या जागेत चेंडू मारून दोन धावा पळण्याचा सपाटा धवन -कोहलीने चालू ठेवला. खराब चेंडूंना चांगल्या ताकदीने दोघे फलंदाज मारून चार धावा वसूल करत होते. शतकी भागीदारी तोडायला अखेर जे पी ड्युमिनीची बदली गोलंदाजी कामी आली. ड्युमिनीला पुढे सरसावत मारताना उडालेला शिखर धवनचा कठीण झेल कप्तान मार्करमने डावीकडे झेपावत टिपला. शिखर धवनने 76 धावा केल्या. 

त्यानंतर विराट कोहलीने एकट्याने धावा जमा करणे चालू केले. समोरून अजिंक्‍य रहाणे, हार्दिक पंड्या, महेंद्र सिंग धोनी आणि केदार जाधव असे चार फलंदाज स्वत:च्या चुकीने बाद झाले. कोहलीवर त्याचा परिणाम झाला नाही. 34वे एक दिवसीय शतक पूर्ण करताना विराटला 119 चेंडू लागले. शतक करताना विराटने फक्त 7 चौकार मारले होते या वरून त्याची मोकळ्या जागेत चेंडू मारायची आणि नंतर न थकता धावा पळण्याची क्षमता लक्षात येते. 

50 षटके संपली असताना भारताच्या नावासमोर 303 धावा जमा झाल्या त्या विराट कोहलीच्या नाबाद 160 धावांच्या बहारदार खेळीमुळेच. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Virat Kohli ODI Century India versus South Africa Shikhar Dhawan