पॉवरप्ले घेत 'एमसीए' सज्ज!

मुकुंद पोतदार
शनिवार, 7 जानेवारी 2017

अध्यक्षपदी ऍड. आपटे; बागवान चिटणीस
पुणे - लोढा समितीच्या शिफारशींबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर याचा सर्वाधिक परिणाम होणाऱ्या इतर काही संघटना अद्याप "टाईम आउट' घेत असताना महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) "पॉवरप्ले' घेत बदलास सामोरे जाण्यास सज्ज झाली आहे. व्यवस्थापन समितीच्या तातडीच्या बैठकीत ऍड. अभय आपटे अध्यक्ष; तर रियाझ बागवान यांची सचिव म्हणून एकमताने निवड झाली.

अध्यक्षपदी ऍड. आपटे; बागवान चिटणीस
पुणे - लोढा समितीच्या शिफारशींबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर याचा सर्वाधिक परिणाम होणाऱ्या इतर काही संघटना अद्याप "टाईम आउट' घेत असताना महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) "पॉवरप्ले' घेत बदलास सामोरे जाण्यास सज्ज झाली आहे. व्यवस्थापन समितीच्या तातडीच्या बैठकीत ऍड. अभय आपटे अध्यक्ष; तर रियाझ बागवान यांची सचिव म्हणून एकमताने निवड झाली.

लोढा समितीमुळे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधील संघटनांच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांची पदे जाणार आहेत. यात मुंबई क्रिकेट संघटनेत अध्यक्ष शरद पवार आणि उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर; तर सौराष्ट्र संघटनेच्या नीरंजन शहा यांनी राजीनामे दिले आहेत.

त्यांच्याऐवजी नव्या नियुक्‍त्या झालेल्या नाहीत. गुजरात आणि बडोदा या संघटनांमधील कुणाची पदे जाणार आणि नवी जबाबदारी कोण स्वीकारणार, हे अद्याप अनिश्‍चीत आहे. एकूण काय तर या संघटना सध्या "टाईम आउट'मध्ये आहेत. "एमसीए'ने मात्र चार पदाधिकाऱ्यांच्या जागी नव्या नियुक्‍त्या केल्या आहेत. जणू काही "टाईम आउट'मध्ये वेळ न घालविता "पॉवर प्ले'वर लक्ष केंद्रीत करून "एमसीए' सज्ज झाली आहे.
उपाध्यक्ष म्हणून विजयकुमार ताम्हाणे आणि रायगडच्या चंद्रकांत मते यांची निवड झाली. या बैठकीला 27 पैकी 23 सदस्य उपस्थित होते.

बैठकीनंतर अजय शिर्के यांनी बोलके विधान केले. "संघटनेत प्रवेश करताना मी आनंदात होतो. आता अध्यक्ष म्हणून निरोप घेतानासुद्धा अशीच भावना आहे. असा योग सहसा येत नाही. निरोपाचा क्षण असूनही आनंदाचे कारण म्हणजे एमसीएचे भवितव्य आता सुरक्षित आहे,' असे ते म्हणाले.

शिर्के यांनी "बीसीसीआय'च्या खजिनदारपदाचा राजीनामा देताना आपला निःस्वार्थी दृष्टिकोन प्रदर्शित केला होता. आता बीसीसीआयचे सचिव आणि "एमसीए'चे अध्यक्ष म्हणून निरोप घेताना त्यांना अजिबात दुःख झालेले नाही. नव्या पदाधिकाऱ्यांविषयी त्यांनी सांगितले की, ऍड. आपटे आधीच्या एका न्यायालयीन लढाईपासून आमच्याबरोबर आहेत. ते कायद्याचे तज्ज्ञ आहेत. त्यांचे संवाद-समन्वय कौशल्य उत्तम आहे. "बीसीसीआय'च्या बैठकांचा अनुभव त्यांना आहे. त्यांनी राज्यात काही महत्त्वाच्या समित्यांवर काम केले आहे. रियाझने तर बॅंकेतील नोकरीचा राजीनामा देऊन संघटनेसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. सचिव हा काम करणारा, कार्यालयात मांडी ठोकून बसणारा, जवळपास 24 तास उपलब्ध असावा लागतो. रियाझने निवड समितीवर दिर्घकाळ काम केले आहे. तो बहुतेक क्‍लबमधील बहुतेक प्रमुख खेळाडूंना व्यक्तीशः ओळखतो.

सध्याच्या स्थितीत जुन्या पदाधिकाऱ्यांना कायम राहता येणार नाही. अशावेळी नव्या फळीत असे सक्षम पर्याय असणे महत्त्वाचे ठरते.' सहाराबरोबरील करार मोडल्यानंतरही गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे भवितव्य सुरक्षित असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

ऍड. आपटे यांनी सांगितले की, "अजय शिर्के यांच्याशिवाय एमसीए असा विचारही आम्ही करू शकत नाही. मी त्यांचा भक्त नाही; पण स्टेडियमच्या उभारणीचे आम्ही स्वप्नही पाहू शकलो नसतो. शिर्के यांच्याकडेच ती दूरदृष्टी आहे. यापुढेही तेच आमचे प्रेरणास्थान राहतील. त्यांना लीडर म्हणण्यापासून आम्हाला कोणतीही समिती रोखू शकणार नाही. आता आमचे पहिले प्राधान्य इंग्लंडविरुद्धची वन-डे आणि ऑस्ट्रेलियाच्या कसोटीच्या संयोजनावर राहील.'

बागवान यांच्याऐवजी निवड समितीचे अध्यक्षाची नियुक्ती लवकरच अपेक्षित आहे.

'सकाळ'चे वृत्त सार्थ
"एमसीए'ने शुक्रवारी तातडीची बैठक बोलाविली असून, अध्यक्षपदी ऍड. आपटे यांची निवड होण्याची शक्‍यता असल्याचे वृत्त शहरातील दैनिकांमध्ये केवळ "सकाळ'ने दिले होते. ते सार्थ ठरल्याचे दिसून आले.

Web Title: mca ready to power play