मिस्बाचे सहा चेंडूंत सहा षटकार 

वृत्तसंस्था
रविवार, 12 मार्च 2017

हाँगकाँगमधील संघ नवा आहे. आम्हाला संघाच्या पूर्ण क्षमतेचा व फलंदाजीचा अद्याप अंदाज आलेला नाही. त्यामुळे पूर्ण 20 षटके खेळण्याचे नियोजन होते. आधी मी तंत्रात बसणारे फटके मारले. सीमारेषा छोटी असल्यामुळे अखेरीस धोका पत्करला. 
- मिस्बा-उल-हक

हाँगकाँग : पाकिस्तानच्या मिस्बा उल हकने सहा चेंडूंमध्ये सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला. हाँगकाँग टी-20 ब्लिट्‌झ या स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली. तो हाँगकाँग आयलंड युनायटेडचे प्रतिनिधित्व करीत आहे.

हुंग हॉम जॅग्वार्सविरुद्ध 19व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर देशबांधव इम्रान अरिफला दोन षटकार मारले; मग 20व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याला स्ट्राइक मिळाली; मग सलग चार षटकार खेचल्यानंतर त्याने एक चौकारही मारला. मिस्बाच्या संघाने 6 बाद 216 धावा केल्या. प्रतिस्पर्धी संघ 8 बाद 183 इतकीच मजल मारू शकला. मिस्बाचा संघ 33 धावांनी विजयी झाला. 

मिस्बाने 37 चेंडूंमध्ये नाबाद 82 धावा फटकावल्या. त्याने सात षटकार व चार चौकारांची आतषबाजी केली. 42 वर्षांच्या मिस्बावर निवृत्त होण्याचे दडपण आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेनंतर त्याने बॅट म्यान करावी, असा आदेशच पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने दिला आहे. 

पाकला अलीकडेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व वेस्ट इंडीजविरुद्ध पराभूत व्हावे लागले. त्यामुळे मिस्बाला किमान कर्णधारपदावरून हटविण्याची मागणी होत आहे. मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी अलीकडेच याविषयी स्पष्ट भाष्य केले होते. पाकिस्तान सुपर लीगमधील कामगिरीनंतर आढावा घेऊ असे मिस्बा मला म्हणाला होता. त्याने उपलब्ध असल्याचे कळविले. त्यामुळे विंडीज दौऱ्यासाठी त्याला कर्णधारपदी कायम ठेवले. अर्थात या दौऱ्यादरम्यान तो 43 वर्षांचा होईल. त्यामुळे दौऱ्यानंतर तो कारकीर्द सुरू ठेवेल असे मला वाटत नाही, असे सूचक वक्तव्य शहरयार यांनी केले होते. 
मिस्बाने मात्र खेळत राहण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर त्याने या कामगिरीद्वारे चोख प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे. 

Web Title: Misbah Ul Haq hong kong t20 blitz cricket