'सेटिंग' नसल्याने कोच झालो नाही; सेहवागचा गौप्यस्फोट 

वृत्तसंस्था
Saturday, 16 September 2017

प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यापूर्वी विराट कोहलीबरोबरही चर्चा केली होती. त्यानेही मला गो फॉर इट, असे सांगितले होते. त्यानंतरच मी अर्ज करण्याचे ठरवले. त्या वेळी मी कोणासही मला यात रस नाही हेच सांगितले असते. 
- वीरेंद्र सेहवाग

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील नव्या वादाला वीरेंद्र सेहवागने तोंड फोडले आहे. भारतीय क्रिकेट मंडळाबरोबर सेटिंग नसल्यामुळेच भारतीय संघाचा कोच होऊ शकलो नाही, असे सांगत भारतीय क्रिकेटमध्ये नवा बॉंबगोळा टाकला. त्याचबरोबर रवी शास्त्रीही स्पर्धेत आहे हे कळले असते तर प्रशिक्षकपदासाठी अर्जही केला नसता, असेही त्याने सांगितले. 

इंडिया टुडे वाहिनीवरील एका कार्यक्रमात सेहवागला याबाबत विचारणा करण्यात आली. तुझ्याऐवजी शास्त्रीला प्रशिक्षक का करण्यात आले, अशी विचारल्यावर सेहवागने, "बघा, माझे काही सेटिंग नव्हते,' असे उत्तर दिले. तो म्हणाला, ""देखिये मै कोच इसलिए नही बन पाया क्‍योंकी जो भी कोच चुन रहे थे, उनसे मेरा कोई सेटिंग नही था.' संघाच्या मार्गदर्शकपदासाठी भारतीय मंडळाने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची त्रिसदस्यीय समिती नेमली होती. त्याने याच मुलाखतीत, शास्त्रीने आपल्याला अर्ज करणार नसल्याचे सांगितले होते, असा दावा केला. 

एकदा केलेली चूक पुन्हा करणार नाही, असे शास्त्रींचे म्हणणे होते. त्यामुळे आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबला मार्गदर्शन केलेल्या सेहवागची प्रशिक्षकपदासाठी स्पर्धा टॉम मूडी, रिचर्ड पिबस आणि लालचंद राजपूत यांच्याबरोबर होती. भारतीय मंडळाच्या अमिताभ चौधरी आणि एम. व्ही. श्रीधर या पदाधिकाऱ्यांनी ऑफर दिल्यामुळेच प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याचेही त्याने सांगितले. 
प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत सेहवाग आघाडीवर होता; पण विराट कोहलीचा विरोध असल्यामुळे सेहवागचे नाव मागे पडले आणि रवी शास्त्रीने बाजी मारली, असे सांगितले जात आहे. 

प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यापूर्वी विराट कोहलीबरोबरही चर्चा केली होती. त्यानेही मला गो फॉर इट, असे सांगितले होते. त्यानंतरच मी अर्ज करण्याचे ठरवले. त्या वेळी मी कोणासही मला यात रस नाही हेच सांगितले असते. 
- वीरेंद्र सेहवाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Missed out on Team India coach job for lack of 'setting': Sehwag