मिताली राज भारताची कर्णधार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

मुंबई - यंदाच्या वर्षात होणाऱ्या महिलांच्या विश्‍वकरंडक पात्रता क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी मिताली राज हिची नियुक्ती करण्यात आली आहे. या संघात देविका वैद्य ही महाराष्ट्राची एकमेव खेळाडू आहे. मोना मेश्राम या विदर्भाच्या अष्टपैलू खेळाडूला मात्र वगळण्यात आले आहे.

नोव्हेंबरमध्ये मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्ध निर्भेळ यश मिळवणाऱ्या संघात फार बदल करण्यात आले नाहीत; अपवाद मात्र मोना मेश्रामचा ठरला आहे. श्रीलंकेत होणारी ही पात्रता स्पर्धा 7 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

भारताला बसला होता फटका
वेस्ट इंडीजविरुद्ध मोठे यश मिळवलेले असले तरी, भारत महिला एकदिवसीय चॅंपियन्सशिप स्पर्धेत सातव्या स्थानी आहे. त्यामुळे विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीचा थेट प्रवेश हुकला आहे. पाकिस्तानविरुद्ध मालिका न खेळल्यामुळे आयसीसीने चॅंपियन्सशिप स्पर्धेत पाकिस्तानला विजयी घोषित केले; तसेच त्यांना सहा गुण बहाल केले आणि भारताचा धावफलक शून्य केला. त्याचा फटका बसल्यामुळे भारत सातव्या स्थानी घसरला आहे.

आता श्रीलंकेतील पात्रता स्पर्धेत भारताला तुलनेने सोपा गट मिळाला आहे. भारताच्या अ गटात श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि थायलंड यांचा समावेश आहे; तर ब गटात दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश, स्कॉटलंड, पापू न्यू गिनी यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज हे देश थेट पात्र ठरले आहेत.

असा आहे संघ -
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, एम. डी. थिरुषकामिनी, वेदा कृष्णमूर्ती, देविका वैद्य, सुषमा वर्मा, झूलन गोस्वामी, शीखा पांडे, सुकन्या परिदा, पूनम यादव, एकदा बिश्‍त, राजेश्‍वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा.

Web Title: mitali raj indian cricket team captain