कर्णधार नसलो, तरी धोनी तोच असेल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

कर्णधाराची जबाबदारी घेतल्यावर अनेक वरिष्ठ खेळाडू टप्प्याटप्प्याने निवृत्त झाले. त्या परिवर्तनाच्या काळात उदयोन्मुख खेळाडूंमध्ये आत्मविश्‍वास निर्माण केला. तेव्हापासून संघातील नवोदित खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्या हातात भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित आहे.
- महेंद्रसिंह धोनी

पुणे - तीनही प्रकारचे क्रिकेट खेळताना प्रत्येक प्रकारासाठी वेगळा कर्णधार ही कार्यपद्धती निदान भारतासाठी लागू पडत नाही. असे सांगत धोनीने आपल्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. त्याचवेळी कर्णधार नसलो तरी काय झाले, मैदानावरील धोनी तोच असेल, असे सांगत चाहत्यांना जुना धोनी बघायला मिळणार याचा विश्‍वासही दिला. 

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या तोंडावर धोनीने अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. पण, आपला निर्णय योग्यच आहे, असे धोनीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत पटवून दिले.

प्रत्येक क्रिकेट प्रकारासाठी वेगळा कर्णधार असावा, यावर माझा विश्‍वास नाही, असे सांगून धोनी म्हणाला, ‘‘कर्णधारपद विभागले जावे असे मला पटत नाही. संघासाठी एकच सेनापती असावा. किमान भारतात ही उक्ती लागू होऊ शकत नाही. कर्णधारपद सोडण्याचा मी विचार केव्हाच केला होता. फक्त योग्य वेळेची वाट बघत होतो. विराटही आता प्रगल्भ बनला आहे. त्याचबरोबर सध्याचा भारतीय संघ हा तीनही प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता बाळगून आहे. त्यामुळेच मी घेतलेला निर्णय योग्यच आहे.’’

कर्णधारपद सोडल्यानंतर धोनीची ही पहिलीच पत्रकार परिषद होती. मैदानावर जितका तो स्वच्छंदपणे फटकेबाजी करतो, तशीच त्याने पत्रकार परिषदेतही केली. कर्णधार नसलो, तरी मैदानावर तोच धोनी असेन असे सांगून तो म्हणाला, ‘‘मी फक्त कर्णधारपद सोडले आहे. मैदानावर यष्टिमागे मीच राहणार आहे. त्यामुळे मैदानावर धोनी तोच म्हणजे पूर्वीचाच असेल. संघासाठी सर्वस्व पणाला लावणारा. सहाकाऱ्यांना सहकार्य करणारा आणि सांभाळून घेणारा. संघातील यष्टिरक्षक हा नेहमीच उपकर्णधार असतो. त्यामुळे कर्णधाराच्या नियोजनानुसार मी मैदानावर बारीक नजर ठेवून असेन. विराटबरोबर यापूर्वीच चर्चा झाली आहे. त्याला मैदानावर हव्या असतील, तेव्हा मी सूचना करण्यास तयार असेन. त्या स्वीकारायच्या की नाही हा त्याचा प्रश्‍न असेल. कारण शेवटी कर्णधार म्हणून यशा अपयशाची जबाबदारी त्यालाच घ्यायची आहे.’’

Web Title: MS Dhoni