'माही'को अभी तक कोई ऑप्शन नही!

हर्षदा कोतवाल
Saturday, 7 July 2018

14 वर्षे, 500 आंतरराष्ट्रीय सामने, आणि तीन आंतरराष्ट्रीय करंडकांनंतर आजही तो विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली फक्त क्रिकेट खेळण्याचा आनंद घेताना दिसतो. क्रिकेटमधील त्याचे यश समजून घ्यायचे असेल तर त्याच्या गूढ मनात डोकावून पाहण्याशिवाय पर्याय नाही. जय पराजय दोन्हीलाही समान वागणूक देणाऱ्या धोनीची नेहमी वर्तमानात जगण्याची सवयच त्याच्या यशाचे गमक आहे.

महेंद्रसिंह धोनी भारताच्या अ संघात खेळत असताना त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात आकाश चोप्रा त्याचा रुममेट होता. त्यावेळी त्याने धोनीला त्याच्या झोपेच्या सवयींबद्दल विचारले असता धोनी म्हणाला होता, आकाश भय्या, डोन्ट वरी, तु जेव्हा लाईट बंद करशील तेव्हा मी झोपेन आणि सकाळी तु पडदे उघल्यावर लगेच उठेन. आकाशने त्याला खाण्याच्या सवयींबद्दल विचारले असता तो म्हणाला, जे उपलब्ध असेल ते मी खाईन. त्यावेळी धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. सरावादरम्यान तो भारताचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिकला चेंडू टाकून झेल घेण्याचा सराव करण्यात मदत करत असे. त्यावेळी संघातील एका खेळाडूने त्याला विचारलं होतं, ''पण कार्तिक तर तुझा स्पर्धक आहे, तु त्याला सरावात मदत कशी करतो?'' यावर धोनीने अतिशय निरागसपणे सांगितलं, ''मला फक्त खेळात भाग घेता आल्याचा आनंद घ्यायचा आहे.'' 

14 वर्षे, 500 आंतरराष्ट्रीय सामने, आणि तीन आंतरराष्ट्रीय करंडकांनंतर आजही तो विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली फक्त क्रिकेट खेळण्याचा आनंद घेताना दिसतो. क्रिकेटमधील त्याचे यश समजून घ्यायचे असेल तर त्याच्या गूढ मनात डोकावून पाहण्याशिवाय पर्याय नाही. जय पराजय दोन्हीलाही समान वागणूक देणाऱ्या धोनीची नेहमी वर्तमानात जगण्याची सवयच त्याच्या यशाचे गमक आहे.  

सामन्याचा रंग काहीही असो मैदानावर डोक्यावर बर्फ ठेवल्यासारखं शांत राहणं हे त्याचं वैशिष्ट आहे जे आजच्या आक्रमक खेळपद्धतीमध्ये आणि खेळाडूंमध्ये क्वचितच दिसतं. त्याच्या यशात मैदानावर शांत राहण्याचा जेवढा वाटा आहे तेवढाच वाटा त्याच्या क्लुप्त्यांचा आहे. न्युझीलंडचा माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग धोनीबद्दल बोलताना म्हणाला होता, ''जे इतर खेळांडूंना जोखमीचे वाटते ते धोनीसाठी सहज साध्य असते. त्याच्या वेडेपणालाही एक पद्धत आहे.'' जेव्हा 2007च्या ट्वेंटी20 विश्वकरंडक अंतिम सामन्यात त्याने हरभजन ऐवजी जोगिंदर शर्माला षटक दिले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या परंतू त्याच्या याच विचाराने भारताने पहिला ट्वेंटी20 विश्वकरंडक जिंकला होता. ट्वेंटी20 विश्वकरंडक जिंकल्यानंतर धोनीची कारकीर्द खूप बदलली असली तरी आजही त्याचे पाय पूर्वीसारखेच जमिनीवर आहेत. 2017 मध्ये त्याने कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी खूप हळहळ व्यक्त केली होती मात्र, जो खेळाडू संघबांधणीसाठी पूर्ण कारकीर्द खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला त्यासाठी कर्णधारपद सोडणे ही मोठी बाब कधीच नव्हती.  

त्याचे अभेद्य नेतृत्त्व हे अनेक भावनिक चढ उतारांपेक्षा अनुभवाच्या चढ उतारांमधून आलेले असल्याने आजही सामन्यात अडचणीच्या वेळी कोहली धोनीकडे धाव घेतो आणि म्हणूनच पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेत वयाच्या 38व्या वर्षीही धोनी संघाचा अविभाज्य भाग असेल. 

रांचीसारख्या छोट्या गावातून आलेला, सुखा दुखात अढळ राहणारा, बटर चिकन आणि किशोर कुमारांचा चाहता असलेला, स्वत:च्या गाड्यांवर, कुत्र्यांवर आणि छोट्या मुलीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या धोनाने जगाला सहजरित्या क्रिकेट खेळणे शिकवले आहे. हॅपी बर्थडे धोनी!!
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni celebrates his 37th birthday