धोनीने सोडले कर्णधारपद; क्रिकेट खेळत राहणार! 

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा आतापर्यंतचा सर्वांत यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आज (बुधवार) राजीनामा दिला. कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला, तरीही संघनिवडीसाठी धोनी उपलब्ध असणार आहे. 

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा आतापर्यंतचा सर्वांत यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आज (बुधवार) राजीनामा दिला. कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला, तरीही संघनिवडीसाठी धोनी उपलब्ध असणार आहे. 

कसोटी क्रिकेटमधून धोनीने डिसेंबर 2014 मध्येच राजीनामा दिला होता. त्यानंतर कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे सोपविण्यात आले होते. मात्र, एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदी धोनीच कायम होता. कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने दमदार कामगिरी केली आहे. अलीकडे झालेली इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर कोहलीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्याची चर्चा सुरू होती. 

या पार्श्‍वभूमीवर धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, तो एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 क्रिकेट खेळत राहणार असल्याचेही 'बीसीसीआय'च्या पत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेच्या संघनिवडीसाठी धोनी उपलब्ध असल्याचेही 'बीसीसीआय'ने म्हटले आहे. या मालिकेसाठीची संघनिवड 6 जानेवारी रोजी होणार आहे. 

धोनीने 72 ट्‌वेंटी-20 सामन्यांत भारताचे नेतृत्व केले. यात 41 सामन्यांत विजय मिळविले; तर 199 सामन्यांमध्ये 110 विजय मिळविले. धोनी कर्णधार असतानाच भारताने पहिला ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक जिंकला. त्यानंतर मायदेशात 2011 मध्ये झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेतही भारताने जगज्जेतेपद मिळविले. त्यानंतर इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतही भारतीय संघ अजिंक्‍य ठरला. 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिंगने 230, तर न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंगने 218 सामन्यांत संघाचे नेतृत्व केले होते. 

Web Title: MS Dhoni steps down as Captain of Indian Cricket team