धोनीच्या टीकाकारांनो आधी तुमची कारकीर्द पाहा : शास्त्री 

वृत्तसंस्था
Wednesday, 15 November 2017

धोनीला पाठिंबा देताना शास्त्री म्हणाले, "सध्या तरी भारतात यष्टीमागे धोनीला पर्याय नाही. त्याच्या क्षमतेला तोडत नाही. त्याची फलंदाजी हा संघाचा बोनस असतो आणि मैदानावरील त्याची नुसती उपस्थितीदेखील सहकाऱ्यांना स्फुरण देणारी ठरते.'' 

कोलकता : माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या क्षमतेवर माजी क्रिकेटपटू नाराजी व्यक्त करत असतानाच मंगळवारी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्यांच्यावर तोफ डागली. "धोनीच्या क्षमतेवर शंका घेण्यापूर्वी तुमच्या कारकिर्दीवर नजर टाका,' अशा शब्दांत शास्त्रींनी त्यांचा समाचार घेतला. 

व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि अजिक आगरकर या माजी क्रिकेटपटूंनी धोनीच्या टी 20 क्रिकेटमधील क्षमतेवर शंका उपस्थित केली होती. त्याच्या सहभागाबाबत विचार करायला हवा, असे थेट विधान त्यांनी केले होते. याला उत्तर देताना शास्त्री म्हणाले, ""धोनीसमोर अजून खूप क्रिकेट शिल्लक आहे. त्याच्यावर टिप्पणी करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीवर नजर टाकावी. भारतीय संघाचे सध्याचे स्वरूप हे कामगिरी आणि गुणवत्ता यावरच आधारले असून, त्यात तो "फिट' बसतो.'' 

धोनीला पाठिंबा देताना शास्त्री म्हणाले, ""सध्या तरी भारतात यष्टीमागे धोनीला पर्याय नाही. त्याच्या क्षमतेला तोडत नाही. त्याची फलंदाजी हा संघाचा बोनस असतो आणि मैदानावरील त्याची नुसती उपस्थितीदेखील सहकाऱ्यांना स्फुरण देणारी ठरते.'' 

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला विश्रांती देण्याचेही शास्त्री यांनी समर्थन केले. ते म्हणाले, ""तुम्हाला परत एकदा सांगतो की हा भारतीय संघ पूर्वीप्रमाणे कुणा एकट्या दुकट्याच्या कामगिरीवर अवलंबून नाही. संघातील प्रत्येक खेळाडू योगदान देत आहे आणि त्याचे कामगिरीत सातत्य आहे. त्यामुळे एखाद्या खेळाडूला विश्रांती दिल्यावर त्याची इतकी चर्चा कशाला?'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni target of ‘jealous’ people who want him out of India cricket team: Ravi Shastri