धोनीच माझ्यासाठी 'लीडर' : रहाणे

टीम ई सकाळ
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

खेळपट्टी चांगली असल्याने 180 पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य सहज गाठण्यासारखे होते. पहिल्या सहा षटकांत जास्तीत जास्त धावा करण्याची आमची रणनीती होती, ती यशस्वी झाली.

पुणे : कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली मी पहिलाच सामना खेळत होतो. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मी अनेक वर्षे खेळलो आहे. त्यामुळे धोनी आणि स्मिथमध्ये तुलना होऊच शकत नाही. धोनीच माझ्यासाठी सर्वोत्तम लीडर असल्याचे पुणे सुपर जायंट्स संघाचा खेळाडू अजिंक्य रहाणे याने सांगितले.

आयपीएलच्या दहाव्या मोसमात पुणे सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्स संघाचा सात गडी राखून पराभव केला. कर्णधार स्मिथच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर पुण्याने पहिला विजय साकारला. स्मिथने अखेरच्या षटकात 13 धावांची गरज असताना चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार खेचले. स्मिथसह धोनी त्यावेळी मैदानात होता, पण धोनी मोठे फटके मारण्यात अपयशी ठरला. याचविषयी बोलताना अजिंक्य राहणेने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत धोनी आणि स्मिथच्या नेतृत्वाविषयी भाष्य केले.

रहाणे म्हणाला, ''स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असून, तो त्या संघाचे उत्तम नेतृत्व करत आहे. पुणे संघाच्या नेतृत्व तो प्रथमच करत होता. सलामीला मी मैदानात सुरवातीपासून आक्रमक धोरण अवलंबिले होते. मयांक अग्रवाल बाद झाल्यानंतर स्मिथ फलंदाजीस आला. त्यामुळे मी माझा नैसर्गिक खेळ करू शकलो. खेळपट्टी चांगली असल्याने 180 पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य सहज गाठण्यासारखे होते. पहिल्या सहा षटकांत जास्तीत जास्त धावा करण्याची आमची रणनीती होती, ती यशस्वी झाली. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीविरुद्ध धोका पत्करून खेळलो. इम्रान ताहिर हा जागितक दर्जाचा खेळाडू असून, त्याने मिळविलेले तीन बळी हे महत्त्वाचे होते. त्याचा आत्मविश्वास प्रचंड होता. गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे आम्ही मुंबई संघाला 200 धावांपर्यंत जाण्यापासून रोखले. अन्यथा आणखी जास्त धावांचे लक्ष्य आम्हाला गाठावे लागले असते. गोलंदाजीदरम्यान धोनी आणि स्मिथ यांच्यात सतत चर्चा होत होती, धोनीकडून देण्यात येणारे सल्ले उपयुक्त होते.''

झेल सोडल्याने सामना गमाविला : बटलर
आमच्या खेळाडूंनी सोडलेले झेल हे आमच्यासाठी धोक्याचे ठरले. झेल सोडल्याने सामना गमवावा लागला, असे मुंबई इंडियन्सचा फलंदाज जोस बटलरने सांगितले. या मोसमात सर्वाधिक रक्कम मिळालेल्या बेन स्टोक्ससोबत खेळताना आनंद वाटला. आम्ही दोघेही इंग्लंडचेच असल्याने त्याच्या गोलंदाजीवर षटकार मारताना आनंद वाटत होता. स्टीव्ह स्मिथ हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याने आज चांगली फलंदाजी केली. सलामीला खेळण्याबाबत व्यवस्थापनाने पूर्वीच कल्पना दिली होती. त्यानुसार मी खेळ केला, असे बटलर म्हणाला.

Web Title: MS Dhoni will be my Leader forever, says Ajinkya Rahane