क्रिकेट: धोनीने नाणेफेक जिंकली; प्रथम क्षेत्ररक्षण

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ भारतापेक्षा वरच्या स्थानावर आहे. पण या दौऱ्यात न्यूझीलंडचा खेळ प्रभावहीन झाला आहे. एकदिवसीय मालिकेसाठी भारताने प्रमुख गोलंदाजांना विश्रांती दिली होती. तरीही नव्या दमाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडचणीत आणले होते.

नवी दिल्ली: फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही. न्यूझीलंडच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

न्यूझीलंडला पूरक असलेल्या धरमशालातील खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखले होते. आता आत्मविश्‍वास उंचावलेल्या भारतीय संघासमोर फलंदाजीला पोषक असलेल्या फिरोजशाह कोटला मैदानावर किमान 280 धावा करण्याचे आव्हान न्यूझीलंडसमोर आहे. गोलंदाजी भक्कम करताना न्यूझीलंडने ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री यांना संघात स्थान दिले. तसेच, डावखुरा फलंदाज अँटॉन डेव्हचिक याला संधी मिळाली आहे.

एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ भारतापेक्षा वरच्या स्थानावर आहे. पण या दौऱ्यात न्यूझीलंडचा खेळ प्रभावहीन झाला आहे. एकदिवसीय मालिकेसाठी भारताने प्रमुख गोलंदाजांना विश्रांती दिली होती. तरीही नव्या दमाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडचणीत आणले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिक पंड्याने तीन गडी बाद केले. बदली गोलंदाज असलेल्या केदार जाधवनेही दोन बळी टिपले.

भारतीय संघ:
रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक, कर्णधार), केदार जाधव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अमित मिश्रा, जसप्रित बुमराह, उमेश यादव.

न्यूझीलंडचा संघ:
मार्टिन गुप्टील, टॉम लॅथम, केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, कोरे अँडरसन, ल्युक रॉंची (यष्टिरक्षक), अँटॉन डेव्हचिक, मिचेल सॅंटनर, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मॅट हेन्री.

Web Title: MS Dhoni won the toss; India to bowl first against New Zealand