पुढच्या 'वर्ल्ड कप'मध्ये धोनी-युवी खेळणार? थोडं थांबा! 

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी आम्हाला मधल्या फळीची चिंता होती. पण आता युवराज आणि केदारच्या कामगिरीमुळे तो प्रश्‍न सुटला आहे. शिवाय, अजिंक्‍य रहाणे, मनीष पांडे आणि अंबाती रायडूसारखे खेळाडू 'बेंच'वर आहेत. यातून भारतीय संघाची ताकद दिसते. रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे सलामीच्या जोडीचा प्रश्‍न भेडसावत आहे. पण तो लवकरच तंदुरुस्त होऊन पुन्हा संघात दाखल होईल. 
- एम. एस. के. प्रसाद, निवड समितीचे अध्यक्ष 

नवी दिल्ली: इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धडाकेबाज पुनरागमन करणारा युवराजसिंग आणि पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजीच्या 'मूड'मध्ये आलेला महेंद्रसिंह धोनी या दोघांची कामगिरी भारतीय क्रिकेटप्रेमींना सुखावणारी होती. पण या मालिकेत चांगली कामगिरी झाली, म्हणजे आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीही ते दोघे संघात असतीलच, असे गृहीत धरता येणार नाही, असे वक्तव्य भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी केले. 

गेल्या काही महिन्यांपासून युवराजचा सूर हरपला होता, तर धोनीच्या बॅटमधूनही अपेक्षेप्रमाणे धावा होत नव्हत्या. पण इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघ अडचणीत असताना धोनी-युवराजने 256 धावांची भागीदारी केली. या सामन्यात भारताचा 15 धावांनी विजय झाला. धोनी-युवराज या दोघांनीही शतके झळकाविली होती. 

या मालिकेतील कामगिरीविषयी काल (मंगळवार) प्रसाद म्हणाले, 'या मालिकेतील प्रत्येक सामना चुरशीचा झाला. हा मालिका विजय सहजासहजी मिळालेला नाही. या मालिकेसाठी संघ निवडताना आम्ही घेतलेले काही निर्णय योग्य ठरले. युवराज आणि केदार जाधवचे पुनरागमन सुखद होते आणि धोनीलाही पुन्हा सूर गवसला आहे. पण म्हणून '2019 मधील विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी युवराज-धोनी संघात असतील' अशी चर्चा या क्षणी करणे व्यर्थ आहे. आजपासून 800 हून अधिक दिवस लांब असलेल्या स्पर्धेविषयी आताच काहीही भाकीत करणे शक्‍य नाही. पण या क्षणी तरी धोनी हा जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाज आहे. एखादी परिस्थिती निर्माण झालीच, तर त्यावेळी काय निर्णय घ्यायचा, हे धोनीला ठाऊक आहे. पण अशी परिस्थिती निदान पुढचे वर्षभर तरी येणार नाही.'' 

Web Title: MS Dhoni, Yuvraj Singh to play 2019 Cricket world cup? Not yet, says MSK Prasad