मुंबई क्रिकेट संघटनेचे आशिष शेलार अध्यक्ष 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

मुंबई - मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. शरद पवार यांनी राजीनामा दिलेला असल्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर शेलार यांची एमसीएच्या कार्यकारिणीने नियुक्ती केली. विनोद देशपांडे आणि पंकज ठाकूर हे नवे उपाध्यक्ष असतील. 

मुंबई - मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. शरद पवार यांनी राजीनामा दिलेला असल्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर शेलार यांची एमसीएच्या कार्यकारिणीने नियुक्ती केली. विनोद देशपांडे आणि पंकज ठाकूर हे नवे उपाध्यक्ष असतील. 

लोढा शिफारशीमुळे आता बीसीसीआयपासून संलग्न संघटनांना घटनात्मक बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे मुंबई संघटनेनेही सर्व शिफारशी स्वीकारताना पदामध्ये काही बदल केले. लोढा शिफारशींनुसार पवार यांनी अध्यक्षपदाचा; तर दिलीप वेंगसरकर यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हे राजीनामे आज कार्यकारिणीने स्वीकारले आणि अध्यक्ष म्हणून शेलार यांना पसंती दिली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शेलार उपाध्यक्षपदी निवडून आले होते. नवे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष निवडणुकीपर्यंत आपल्या पदावर राहतील, असे मुंबई संघटनेचे संयुक्त सचिव डॉ. उमेश खानविलकर यांनी सांगितले. 

लोढा शिफारशी आम्ही स्वीकारल्या आहेत. त्याची कार्यवाही कशी करायची, यावर आम्ही चर्चा केली, असे नवे अध्यक्ष शेलार यांनी सांगिले. तसेच त्यांनी पवार आणि वेंगसरकर यांनी एमसीएसाठी दिलेल्या योगदानाचा आणि कार्याचा गौरव केला. मुंबई संघटनेच्या घटना समितीने लोढा शिफारशीनुसार घटनेत बदल करण्याचे काम सुरू केले आहे. त्यास संघटनेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. पंकज ठाकूर कार्यकारिणीत सदस्य होते. त्यांना प्रथमच उपाध्यक्षपदी बढती मिळाली आहे; तर विनोद देशपांडे दोन वर्षांपूर्वी उपाध्यक्ष होते. निवडणुकीत त्यांनी कार्यकारिणी सदस्यत्वाची निवडणूक लढवली होती.

Web Title: Mumbai Cricket Association president Ashish Shelar