मुंबईसमोर तमिळनाडूचे आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

राजकोट : ज्या तमिळनाडूचा पराभव करून गतविजेत्या मुंबईने यंदाच्या रणजी मोहिमेची सुरवात केली होती, त्याच तमिळनाडूचे आव्हान आता उपांत्य फेरीत उभे राहिले आहे. उद्यापासून हा सामना सुरू होईल तेव्हा मुंबईला पारंपरिक खडूस खेळ करावा लागेल.

यंदाच्या मोसमात मुंबईने एकही सामना गमावलेला नाही; तर मुंबईकडून हार स्वीकारल्यानंतर तमिळनाडूही अपराजित राहिलेले आहे, त्यामुळे उपांत्य फेरीची लढत चुरशीची होईल, यात शंक नाही. 

राजकोट : ज्या तमिळनाडूचा पराभव करून गतविजेत्या मुंबईने यंदाच्या रणजी मोहिमेची सुरवात केली होती, त्याच तमिळनाडूचे आव्हान आता उपांत्य फेरीत उभे राहिले आहे. उद्यापासून हा सामना सुरू होईल तेव्हा मुंबईला पारंपरिक खडूस खेळ करावा लागेल.

यंदाच्या मोसमात मुंबईने एकही सामना गमावलेला नाही; तर मुंबईकडून हार स्वीकारल्यानंतर तमिळनाडूही अपराजित राहिलेले आहे, त्यामुळे उपांत्य फेरीची लढत चुरशीची होईल, यात शंक नाही. 

मुंबई भले गतविजेते असले आणि यंदा काही सामन्यांत निर्णायक विजय मिळवून गटात अव्वल स्थान मिळवलेले असले, तरी अखेरच्या काही सामन्यांत कामगिरी गतविजेत्यांसारखी झालेली नाही. कठोर परिश्रम करून सामना जिंकण्यात किंवा पहिल्या डावात आघाडी मिळवण्यात यश आलेले आहे. हैदराबादविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात तर नाकी दम आला होता. अखेर 39 धावांच्या विजयावर समाधान लाभले. 

दुसरीकडे तमिळनाडूने आपली कामगिरी उत्तरोत्तर उंचावत नेली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात बलाढ्य कर्नाटकचा पराभव करण्याची किमया केली. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात 199 धावा करणारा के. एल. राहुल आणि 304 धावा करणारा करुण नायर यांना दोन्ही डावांत पूर्णपणे अपयशी ठरवले होते. त्यामुळे दोन्ही संघांचा विचार केला तर मुंबईपेक्षा तमिळनाडू संघाचा आत्मविश्‍वास वाढलेला आहे. 

श्रेयस, सूर्यकुमारकडून अपेक्षा 
खरे तर मुंबईकडे श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव असे दोन खंदे फलंदाज आहेत. गतवर्षी श्रेयस तर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, परंतु या दोघांना लौकिकाप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. काही साखळी सामन्यांत त्यांनी भले शतके केली, पण सातत्य राखता आलेले नाही. उपांत्यपूर्व फेरीतील त्यांचे अपयश ठळक उठून दिसले होते. 
श्रेयस, सूर्यकुमारप्रमाणे शार्दुल ठाकूरचीही तीच अवस्था आहे. हैदराबादविरुद्ध संधी असतानाही त्याने निराशा केली होती. या तिघांचे अपयश एकट्या अभिषेक नायरने फलंदाजी आणि गोलंदाजीत भरून काढले होते. 

मुंबईला खेळाडूंच्या दुखापतीचा फटका बसलेला आहे. सलामीवीर अखिल हेरवाडकर, अनुभवी धवल कुलकर्णी हे खेळू शकणार नाहीत. तसेच आंतरराष्ट्रीय स्टार रोहित शर्मा आणि अजिंक्‍य रहाणेही अनफिट आहेत, त्यामुळे मुंबईला संघात सातत्याने बदल करावे लागले आहेत. 

सध्या तरी तमिळनाडूची फलंदाजी मुंबईपेक्षा उजवी वाटत आहे. कौस्तुभ गांधी (726 धावा, सरासरी 60.50), अभिनव मुकुंद (689, सरासरी 62.63) आणि दिनेश कार्तिक (664, सरासरी 60.26) हे फलंदाज फॉर्मात आहेत; तर गोलंदाजीत वेगवान अश्‍विन क्रिस्ट, कृष्णमूर्ती विग्नेश आणि टी. नटराजन यांनी कर्नाटकला पहिल्या डावात शंभरीही गाठू दिली नव्हती. 

पृथ्वी शॉवर लक्ष 
वंडरकिड म्हणून प्रसिद्ध असलेल्या 17 वर्षीय पृथ्वी शॉच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. सलामीवीरांच्या अपयशानंतर मुंबईने अखेर शालेय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम करणाऱ्या पृथ्वी शॉची निवड केली. भारताच्या 19 वर्षांखाली संघात खेळलेल्या या खेळाडूबाबत संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून फिडबॅक घेतल्यानंतर शॉची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Mumbai to face Tamilnadu in Ranji Semi Final