महाराष्ट्र डर्बीसाठी मुंबई-पुणे संघ सज्ज

मुकुंद पोतदार
गुरुवार, 6 एप्रिल 2017

बेन स्टोक्‍स विरुद्ध किएरॉन पोलार्ड मुकाबला लक्षवेधी

बेन स्टोक्‍स विरुद्ध किएरॉन पोलार्ड मुकाबला लक्षवेधी
पुणे - मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट यांच्यातील महाराष्ट्र डर्बीची लढत गुरुवारी येथील एमसीए स्टेडियमवर रंगेल. गतवर्षी प्ले-ऑफ गाठण्यात दोन्ही संघ अपयशी ठरले. त्यामुळे या वेळी मोहिमेची धडाक्‍यात सुरवात करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. बेन स्टोक्‍स विरुद्ध किएरॉन पोलार्ड यांच्यातील धुमश्‍चक्री या लढतीचे वैशिष्ट्य तसेच निर्णायक क्षण ठरू शकते.

गतवर्षी सुपरजायंट्‌सने जोरदार पदार्पण करीत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर विजयी सलामी दिली. नंतर मुंबईने या पराभवाची परतफेड करीत पुण्याला घरच्या मैदानावर हरविले. एकूण मोसम मात्र दोन्ही संघांसाठी निराशाजनक ठरला. दोन्ही संघांनी दूरगामी परिणाम साधण्यासाठी काही निर्णय घेतले. पुण्याने आयपीएलमधील यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला हटवून स्टीव स्मिथकडे सूत्रे सोपविली, तर मुंबईने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिंग याच्याऐवजी श्रीलंकेच्या माहेला जयवर्धने याला प्रशिक्षक म्हणून पाचारण केले. असे मोठे बदल करणाऱ्या दोन्ही संघांनी मोसमापूर्वी जोरदार होमवर्क केल्याचे स्पष्ट होते. साहजिकच त्यांच्या चाहत्यांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत.

स्टोक्‍स वि. पोलार्ड
पुण्याने 14.5 कोटी रुपये मोजून इंग्लंडचा अष्टपैलू स्टोक्‍सला करारबद्ध केले. तो संघाच्या डावपेचांचा केंद्रबिंदू असण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे मुंबईकडे पोलार्ड याच्या रूपाने असा हुकमी एक्का आहे. कितीही चेंडू टाकायला किंवा खेळायला मिळाले तरी पारडे फिरविण्याची विलक्षण क्षमता असलेला पोलार्ड क्षेत्ररक्षणातही धक्के देऊ शकतो. विश्‍वकरंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेमुळे इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात निर्माण झालेल्या छत्तीसच्या आकड्याचे पडसाद या लढतीत उमटू शकतात.

धोनीच्या खेळाची छाननी
गेल्या मोसमातील निराशाजनक अपयशानंतर धोनीला कर्णधारपद गमवावे लागले. प्रेरणादायी कर्णधार ते पदच्युत कर्णधार, असा टोकाचा बदल एका मोसमात घडल्यानंतर धोनीसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरू नये. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून बुद्धिमान, चपळ आणि चाणाक्ष धोनीचे दर्शन घडणार का, याकडे चाहत्यांपेक्षा जास्त लक्ष तज्ज्ञांचे आणि अर्थातच फ्रॅंचायजीचेही असेल. गेल्या मोसमात धोनीच्या देहबोलीत नेहमीची आश्वासकता आणि सक्रियता दिसली नाही. कर्णधारपद गेल्यानंतर त्याने वैयक्तिक पातळीवर कशी तयारी केली आहे, याचे संकेत उद्या मिळतील.

खेळपट्टीविषयी उत्सुकता
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी तीन दिवसांत आटोपल्यानंतर एमसीए स्टेडियमची खेळपट्टी खराब असल्याचा शेरा आयसीसीने मारला. तसे पाहिले तर आयपीएलमधील सामन्यात भरपूर धावा झाल्या, असे चित्र येथे क्वचित दिसले आहे; पण भारत-इंग्लंड वन-डेच्यावेळी खेळपट्टी अगदी आदर्श होती. कसोटीनंतर एमसीएने क्‍युरेटर म्हणून पांडुरंग साळगावकर यांच्या जोडीला प्रथमश्रेणी क्रिकेटचा दीर्घ अनुभव असलेल्या सुरेंद्र भावे यांना पाचारण केले आहे. खेळपट्टी किती स्पोर्टिंग असणार हा उत्सुकतेचा मुद्दा असेल.

Web Title: mumbai indians & rising pune supergiants cricket match