कुंबळेंची फेरनियुक्ती मुलाखतीनंतरच?

पीटीआय
शुक्रवार, 26 मे 2017

मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागविल्याने अनिल कुंबळे यांना दूर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली; पण कुंबळे यांच्याबरोबरील करार एका वर्षाचा आहे. तो चॅंपियन्स स्पर्धेनंतर संपणार आहे. त्यामुळेच केवळ प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे अर्ज मागविताना कुंबळेंचा या सर्व प्रक्रियेत थेट प्रवेश असेल, असे स्पष्ट करीत जणू त्यांची फेरनियुक्ती निश्‍चित असल्याचे संकेत दिले आहेत.

‘बीसीसीआय’ने एक पत्रक काढत अर्ज मागवून ही सर्व प्रक्रिया पारदर्शक असेल, असे जाहीर केले; पण त्याच वेळी कुंबळे यांना या प्रक्रियेत थेट प्रवेश असेल, असेही मंडळाने स्पष्ट केले. इच्छुकांना ३१ मेपर्यंत अर्ज करण्यास सांगितले आहे. भारतीय संघ चॅंपियन्स स्पर्धेत खेळत असतानाच सर्व अर्जांची छाननी होईल. 

सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांचा समावेश असलेली क्रिकेट सल्लागार समिती इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. याच समितीने गतवर्षी कुंबळे यांची निवड केली होती. कुंबळे यांनी सुरवातीस या पदासाठी अर्जही केला नव्हता; पण समितीने त्यांना मुलाखतीसाठी बोलावले होते आणि अखेर त्या वेळचे संघ संचालक रवी शास्त्री यांच्याऐवजी कुंबळेंना पसंती दिली होती. ‘बीसीसीआय’ने यावर शिक्कामोर्तब करताना कुंबळे यांना एकाच वर्षासाठी करारबद्ध केले होते. 

कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संघाने १७ पैकी एकच कसोटी गमावली, तसेच न्यूझीलंड व इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही यश मिळवले. त्यांचे कर्णधार विराट कोहलीबरोबरही सूर जुळले आहेत. 

आता कुंबळे यांच्याबरोबर संघाच्या सपोर्ट स्टाफबाबत चर्चा सुरू असताना त्यांना दूर केले जाण्याची शक्‍यता धूसर आहे. त्यांच्याबरोबर नव्याने करार करण्यापूर्वी आम्ही अन्य पर्यायही तपासून पाहिले. आमचा कारभार पारदर्शी आहे, हेच दाखवण्याचा मंडळाचा प्रयत्न असेल, असे मानले जात आहे.

झहीर गोलंदाजी प्रशिक्षक?
झहीर खानला गोलंदाज मार्गदर्शक करण्याची सूचना कुंबळे यांनी केल्याचे समजते. कुंबळे संघासोबत गोलंदाजी प्रशिक्षक असावेत यासाठी आग्रही आहेत. मात्र, त्यानंतरही झहीर चॅंपियन्स स्पर्धेसाठी संघासोबत जाण्याची शक्‍यता कमी आहे. झहीर यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव कार्यकारिणीत चर्चेत येईल आणि त्यानंतरच निर्णय होऊ शकेल. गतवर्षीही झहीरला हा प्रस्ताव देण्यात आला होता; पण त्या वेळी काही कारणास्तव करार झाला नव्हता, असे सांगितले जात आहे.

Web Title: mumbai news sports anil kumble bcci