मुंबईचा प्रतिकार सुरू 

पीटीआय
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

इंदूर - पहिल्या डावात जम बसल्यावर खराब फटक्‍यांनी विकेट दिलेल्या सूर्यकुमार यादव; तसेच श्रेयस अय्यरने मुंबईच्या रणजी अंतिम लढतीतील चिवट प्रतिकार सुरू केला. या दोघांनी शतकी भागीदारी करीत मुंबईच्या विजेतेपद राखण्याच्या अपेक्षांना नक्कीच संजीवनी दिली आहे. 

इंदूर - पहिल्या डावात जम बसल्यावर खराब फटक्‍यांनी विकेट दिलेल्या सूर्यकुमार यादव; तसेच श्रेयस अय्यरने मुंबईच्या रणजी अंतिम लढतीतील चिवट प्रतिकार सुरू केला. या दोघांनी शतकी भागीदारी करीत मुंबईच्या विजेतेपद राखण्याच्या अपेक्षांना नक्कीच संजीवनी दिली आहे. 

अंतिम लढतीच्या तिसऱ्या दिवशी सर्वच मुंबईच्या अपेक्षेनुसार घडले नाही. सलामी चांगली नव्हती. पृथ्वी शॉ अतिआक्रमक होता; तर श्रेयस सलग दुसऱ्या अंतिम लढतीत शतक करणार असे वाटत असतानाच परतला; पण दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळी चेहऱ्यावर स्मित होते. तिसऱ्या दिवसअखेर मुंबईकडे 108 धावांची आघाडी आहे. गुजरातचा बचावात्मक पवित्रा सामना समान स्थितीत आल्याचेच दाखवत आहे. 

श्रेयस तसेच सूर्यकुमार या आक्रमकांनी दोन तास खेळपट्टीवर उभे राहण्यास प्राधान्य दिले. पिछाडी भरून काढल्यावर गुजरातला आक्रमक क्षेत्ररचना पांगवणे भाग पडेल, याची त्यांना जाणीव होती. ही जोडी जमते असे बघितल्यावरच गुजरात बचावात्मक झाले. त्यांनी पॉईंट आणि मिडविकेटवरील क्षेत्ररक्षक सीमारेषेवर नेले. हार्दिक पटेलने डाव्या यष्टीबाहेर मारा सुरू केला, हे पाहून श्रेयसने आक्रमण सुरू केले. त्यामुळे सूर्यकुमारने सहकाऱ्याची भूमिका घेतली. श्रेयसच्या तीन षटकारांना सूर्यकुमार मनगटाचा वापर करीत हुशारीने धावा करीत साथ देत होता. 

गुजरातने शतकी आघाडीमुळे आक्रमक क्षेत्ररचना केली. त्यांना पांगवण्यासाठी पृथ्वी शॉने आक्रमण सुरू केले. त्यास संयमाची जोड देऊ शकला नाही. गजाला सलग तीन चौकार मारल्यावरही त्याने ऍक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला. आरपी सिंगने जीवदान दिले; पण तो यातून शिकला नाही. खूपच बाहेरच्या चेंडूचा पाठलाग करीत तो बाद झाला. 

दुसऱ्या नव्या चेंडूवर मुंबईकरांनी प्रभावी मारा करीत गुजरातचे शेपूट वळवळणार नाही, याची खबरदारी घेतली. तेरा षटकात अखेरचे चार फलंदाज परतले व त्यात 37 धावाच झाल्या. तिसऱ्या दिवसाने चित्र बदलण्यास सुरवात झाली आहे हे नक्की. 

संक्षिप्त धावफलक 
मुंबई ः 228 आणि 3 बाद 208 (अखिल हेरवाडकर 16, पृथ्वी शॉ 44 - 35 चेंडूंत 8 चौकार, श्रेयस अय्यर 82 - 137 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकार, सूर्यकुमार यादव खेळत आहे 45 - 175 चेंडूंत 5 चौकार, आदित्य तरे खेळत आहे 13 - 24 चेंडूंत 3 चौकार, चिंतन गजा 19-8-54-3) वि. गुजरात ः 329 (भार्गव मेरई 45, पार्थिव पटेल 90, मनप्रीत जुनेजा 77, रुजुल भट्ट 25, रुश कलारिया 27 - 55 चेंडूंत 4 चौकार, शार्दूल ठाकूर 29.3-6-84-4, बलविंदर संधू 24-2-63-3, अभिषेक नायर 30-7-101-3). 
 

Web Title: mumbai vs gujrat ranji trophy