आगामी प्रतिस्पर्ध्याची नदालला वाटतेय धास्ती

वृत्तसंस्था
Friday, 18 May 2018

शापोवालोव उत्तम खेळाडू आहे. तो तरुण आहे. त्याच्याकडे बरीच एनर्जी आणि प्रचंड गुणवत्ता आहे. टोमास बर्डीचविरुद्ध त्याने अटीतटीचा सामना जिंकला. तो माझ्यासाठी खडतर प्रतिस्पर्धी ठरेल. 
- रॅफेल नदाल 

रोम - इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत संभाव्य विजेत्या रॅफेल नदाल याने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. क्‍ले कोर्टवर खेळत असलेल्या नदालला पुढील फेरीतील प्रतिस्पर्धी डेनिस शापोवालोव याची मात्र धास्ती वाटत आहे. 

नदालने दामीर डीझुम्हुर याचा 61 मिनिटांतच 6-1, 6-0 असा धुव्वा उडविला, तर शापोवालोवने रॉबीन हासीवर 7-6 (7-3), 6-7 (5-7), 6-3 अशी मात केली. नदाल जागतिक क्रमवारीत दुसऱ्या, तर शापोवालोव 29व्या क्रमांकावर आहे. हे दोघे एकदाच आमनेसामने आले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रॉजर्स करंडक स्पर्धेत झालेल्या लढतीत शापोवालोव याने बाजी मारली होती. 31 वर्षांच्या नदालला 19 वर्षांच्या शापोवालोव याच्या क्षमतेची कल्पना आहे. झंझावाती सर्व्हिस हे शापोवालोव याचे मुख्य अस्त्र आहे. 

चार वेळच्या विजेत्या नोव्हाक जोकोविच याने आगेकूच कायम राखली. त्याने जॉर्जियाच्या निकोलोझ बॅसिलॅश्‍विली याला 6-4, 6-2 असे हरविले. ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमला पराभवाचा धक्का बसला. इटलीच्या फॅबिओ फॉग्नीनी याच्याकडून तो 4-6, 6-1, 3-6 असा हरला. 

शापोवालोव उत्तम खेळाडू आहे. तो तरुण आहे. त्याच्याकडे बरीच एनर्जी आणि प्रचंड गुणवत्ता आहे. टोमास बर्डीचविरुद्ध त्याने अटीतटीचा सामना जिंकला. तो माझ्यासाठी खडतर प्रतिस्पर्धी ठरेल. 
- रॅफेल नदाल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nadal seems to be facing the opposition