esakal | न्यूझीलंड पुरुष, महिलांचा मालिका विजय 
sakal

बोलून बातमी शोधा

न्यूझीलंड पुरुष, महिलांचा मालिका विजय 

अखेरचा सामना विशेष... 
- तीन सामन्यांच्या ट्‌वेंटी-20 मालिकेत भारताची दोन वर्षांत प्रथमच हार. यापूर्वीच्या दहा मालिकेत नऊ विजय आणि एक बरोबरी. 
- यापूर्वीचा पराभव 2017 च्या जुलैत वेस्ट इंडीजविरुद्ध. 
- भारताची न्यूझीलंडविरुद्धची आठवी ट्‌वेंटी-20 हार. यापूर्वीचे सर्वाधिक सात पराभव इंग्लंडविरुद्ध. 
- न्यूझीलंडने ट्‌वेंटी-20 मधील भारताविरुद्धची दुसरी सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. 
- तीन सामन्यांच्या ट्‌वेंटी-20 मालिकेत धावा देण्यात हार्दिक पंड्या (131) आता आघाडीवर, यापूर्वी कृणाल पंड्या (117 वि. ऑस्ट्रेलिया). 
- हार्दिकप्रमाणेच या मालिकेत खलील अहमद (122) आणि कृणाल पंड्या (119) यांनीही यापूर्वीच्या वाईट कामगिरीपेक्षा जास्त धावा दिल्या. 
- या लढतीत एकंदर नऊ गोलंदाजांकडून तीसपेक्षा जास्त धावा. 
- धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता 594 विकेट तर आघाडीवरील मार्क बाऊचरच्या 596. 

न्यूझीलंड पुरुष, महिलांचा मालिका विजय 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

हॅमिल्टन (न्यूझीलंड) : न्यूझीलंडच्या पुरुष आणि महिला संघाने रविवारी भारताविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजय मिळविला. पुरुष संघाने अखेरच्या सामन्यात 4 धावांनी सरशी साधत 2-1, तर महिलांनी 2 धावांनी विजय मिळवून 3-0 अशी मालिका जिंकली. कॉलिन मुन्‍रो, टीम साऊदी आणि सोफी डिव्हाइन न्यूझीलंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. 

मुन्‍रो, साऊदीची निर्णायक कामगिरी 
कॉलिन मुन्‍रोच्या स्फोटक 72 धावांच्या खेळीनंतर टीम साऊदीच्या अखेरच्या अनुभवी षटकाने भारताला विजयापासून वंचित ठेवले. त्यात भारतीय क्षेत्ररक्षकांकडून सोडलेले गेलेले झेलदेखील त्यांच्या पराभवाच कारणीभूत ठरले. 

न्यूझीलंडच्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन वगळता भारताच्या बढती मिळालेल्या फलंदाजांनी आश्‍वासक फलंदाजी म्हणण्यापेक्षा फटकेबाजी केली; पण धावांचा वेग वाढवताना कुठे थांबायचे आणि संयम कसा बाळगायचा, या आघाडीवर भारतीय युवा खेळाडू कमी पडले. विजय शंकर आणि रिषभ पंत यांनी जरूर न्यूझीलंडच्या गोलंदाजांची लय बिघडवली; पण त्यांना कुठे थांबायचे ते कळले नाही. संयम बाळगून कर्णधार रोहितच्या साथीत ते भागीदारी वाढवू शकले नाहीत. त्यानंतर विजयासाठी 3 षटकांत 47 धावांची आवश्‍यकता असे समीकरण असताना दिनेश कार्तिक आणि कृणाल पंड्या यांनी 18 आणि 19 या दोन षटकांत 32 धावा कुटल्या; पण साऊदीच्या अखेरच्या षटकांत त्यांना 11 धावांच मिळाल्या. दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घ्यायची की नाही, या नादात या जोडीने अखेरच्या षटकातील एक महत्त्वपूर्ण चेंडू "डॉट' घालवला. या षटकांत अखेरचे तीन चेंडू टाकताना साऊदीने चेंडूचा राखलेला टप्पा आणि चेंडूला दिलेली खोली खूप महत्त्वाची ठरली. त्यामुळे भारताचा डाव 6 बाद 208 असा मर्यादित राहिला. 

सततच्या अपयशानंतर विश्‍वकरंडकासाठी संघातील स्थान पणाला लागलेल्या मुन्‍रोच्या स्फोटक फलंदाजीने सामन्यात पडणाऱ्या धावांच्या पावसाची कल्पना दिली. टीम सैफर्टच्या साथीत 8 षटकांतच 80 धावांची सलामी देण्याऱ्या मुन्‍रोने नंतर एकहाती भारतीय गोलंदाजीची पिटाई केली. त्याने 40 चेंडूंत 5 चौकार आणि तेवढेच षटकार ठोकून 72 धावा केल्या. कुलदीपने त्याला बाद केले. पाठोपाठ खलीलने विल्यम्सनचा अडसर दूर केला. यामुळे त्यांचा धावांचा वेग मंदावला. तरी कॉलिन डी ग्रॅंडहोमच्या 16 चेंडूंतील 30 धावांनी न्यूझीलंडचे आव्हान भक्कम केले. 

डिव्हाइनची अष्टपैलू कामगिरी 
महिलांच्या सामन्यातही जबरदस्त नाट्य बघायला मिळाले. मिताली राजने संधी मिळाल्यावर अनुभव पणाला लावला; पण अखेरच्या चेंडूवर चौकार वसूल करायला तिला अपयश आले. 

विजयासाठी 162 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा स्मृती मानधनाने भारताला विजयाच्या मार्गावर नेले. तिच्या 52 चेंडूंतील 86 धावांच्या खेळीने सुकर झालेल्या विजयाच्या मार्गावर फक्त पुढे जाण्याचे काम अन्य फलंदाजांना जमले नाही. न्यूझीलंडच्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 4 बाद 159 असा मयादित राहिला. न्यूझीलंडने तिसराही सामना जिंकून टी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखले. 

मानधनाच्या झंझावती खेळीनंतर पुन्हा एकदा मधल्या फळीला अपयश आले. कर्णदार हरमनप्रीत या सामन्यातही अपयशी ठरली. मानधना बाद झाली तेव्हा भारताला 4.3 षटकांत 39 धावांची गरज होती. मिताली आणि दीप्ती शर्मा यांनी प्रयत्न केले; पण त्यांना चौकार मिळत नव्हते. त्यामुळे अखेरच्या षटकांत 16 धावांचे आव्हान त्यांच्या आवाक्‍याबाहेरचे राहिले. 

त्यापूर्वी, सोफी डिव्हाइनने भारतीय गोलंदाजांवर पूर्ण वर्चस्व राखले. 17व्या षटकांत 2 बाद 140 अशा धावसंख्येवर डिव्हाइन बाद झाली. त्यानंतर तीन षटकांत मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजांना 21 धावांचीच भर घालता आली. 

संक्षिप्त धावफलक 
पुरुष ः न्यूझीलंड 20 षटकांत 4 बाद 212 (टीम सैफर्ट 43, कॉलिन मुन्‍रो 72-40 चेंडू, 5 चौकार, 5 षटकार, केन विल्यम्सन 27, कॉलिन डी ग्रॅंडहोम 30, 16 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, कुलदीप यादव 2-26) वि.वि. भारत (20 षटकांत) 6 बाद 208 (विजय शंकर 43 -28 चेंडू, 5 चौकार, 3 षटकार, रोहित शर्मा 38, रिषभ पंत 28 -12 चेंडू, 1 चौकार, 3 षटकार, दिनेश कार्तिक नाबाद 33 -16 चेंडू, 4 षटकार, कृणाल पंड्या नाबाद 29 - 13 चेंडू, 2 चौकार, 2 षटकार, डॅरिल मिशेल 2-27, मिशेल सॅंटनेर 2-32). 

महिला ः न्यूझीलंड 20 षटकांत 7 बाद 161 (सोफी डिव्हाइन 72 -52 चेंडू 8 चौकार, 2 षटकार, ऍमी सॅटर्थवेट 31, दीप्ती शर्मा 2-28) वि.वि. भारत 20 षटकांत 4 बाद 159 (स्मृती मानधना 86 -62 चेंडू, 12 चौकार, 1 षटकार, जेमिमा रॉड्रिग्ज 21, मिताली राज नाबाद 24, दीप्ती शर्मा नाबाद 21, सोफी डिव्हाइन 2-21). 

अखेरचा सामना विशेष... 
- तीन सामन्यांच्या ट्‌वेंटी-20 मालिकेत भारताची दोन वर्षांत प्रथमच हार. यापूर्वीच्या दहा मालिकेत नऊ विजय आणि एक बरोबरी. 
- यापूर्वीचा पराभव 2017 च्या जुलैत वेस्ट इंडीजविरुद्ध. 
- भारताची न्यूझीलंडविरुद्धची आठवी ट्‌वेंटी-20 हार. यापूर्वीचे सर्वाधिक सात पराभव इंग्लंडविरुद्ध. 
- न्यूझीलंडने ट्‌वेंटी-20 मधील भारताविरुद्धची दुसरी सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. 
- तीन सामन्यांच्या ट्‌वेंटी-20 मालिकेत धावा देण्यात हार्दिक पंड्या (131) आता आघाडीवर, यापूर्वी कृणाल पंड्या (117 वि. ऑस्ट्रेलिया). 
- हार्दिकप्रमाणेच या मालिकेत खलील अहमद (122) आणि कृणाल पंड्या (119) यांनीही यापूर्वीच्या वाईट कामगिरीपेक्षा जास्त धावा दिल्या. 
- या लढतीत एकंदर नऊ गोलंदाजांकडून तीसपेक्षा जास्त धावा. 
- धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता 594 विकेट तर आघाडीवरील मार्क बाऊचरच्या 596. 
 

तत्पूर्वी, कॉलीन मुन्रो (72) आणि टीम सेइफर्ट (43) यांनी सलामीलाच केलेल्या फटकेबाजीच्या जोरावार न्यूझीलंडने भारतासमोर 213 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या दोघांनी रचलेल्या भक्कम पायावर अन्य किवी फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला. केन विलियम्सनने 27 धावा केल्या, तर कॉलीन ग्रँडहोमने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना भारताची डोकेदुखी वाढवली. त्याने 16 चेंडूंत 30 धावा केल्या.
 

loading image