निकोल्सच्या शतकी खेळीने न्यूझीलंडचा डाव सावरला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

दिवस अखेरीस द. आफ्रिका 2 बाद 24
वेलिंग्टन (न्यूझीलंड) - हेन्‍री निकोल्सच्या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडला पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध समाधानकारक मजल मारता आली. त्यानंतर दिवसअखेरीस दक्षिण आफ्रिकेलाही झटपट दोन धक्के सहन करावे लागले.

दिवस अखेरीस द. आफ्रिका 2 बाद 24
वेलिंग्टन (न्यूझीलंड) - हेन्‍री निकोल्सच्या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडला पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध समाधानकारक मजल मारता आली. त्यानंतर दिवसअखेरीस दक्षिण आफ्रिकेलाही झटपट दोन धक्के सहन करावे लागले.

पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 268 धावांत संपुष्टात आला. पहिल्या तासाभरात न्यूझीलंडची अवस्था 3 बाद 21 अशी झाली होती. त्यानंतर निकोल्सने एकहाती संघाचा डाव सावरला. त्याने 118 धावांची खेळी केली. दिवसअखेरीस दक्षिण आफ्रिकेने आपली सलामीची जोडी गमावली. खेळ थांबला तेव्हा नाईट वॉचमन कागिसो रबाडा आठ, तर हशिम आमला शून्यावर खेळत होता. पहिल्या दिवशी बारा फलंदाज बाद होत असताना निकोल्सने आपल्या शतकी खेळीने न्यूझीलंडचा डाव नुसता सावरलाच नाही, तर टीकाकारांना देखील उत्तर दिले.

न्यूझीलंड संघ अडचणीत असताना निकोल्सने एक जबरदस्त खेळी करताना कारकिर्दीतले पहिले शतक साजरे केले. बीजे वॅटलिंगच्या साथीत त्याने 103 धावांची भागीदारी केली. सहाव्या विकेटसाठी न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची विक्रमी भागीदारी ठरली. यापूर्वी 85 वर्षांपूर्वी टेड बॅडकूक आणि गिफ व्हिवियन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 100 धावांची भागीदारी केली होती. या भागीदारीनंतर टीम साऊदीने 30 चेंडूंत 27 धावांची आक्रमक खेळी करताना न्यूझीलंडची धावसंख्या वाढवली.

त्यानंतर अखेरच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेला झटपट दोन धक्के बसले. डीन एल्गार आणि स्टिफन कूक ही सलामीची जोडी 12 धावांतच गारद झाली. सात षटकांच्या खेळात दक्षिण आफ्रिकेने 2 बाद 24 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक -
न्यूझीलंड 79.3 षटकांत 268 (हेन्‍री निकोल्स 118, बीजे वॅटलिंग 34, टीम साऊदी 27, जेपी ड्युमिनी 4-47, केशव महाराज 2-47, कागिसो रबाडा 2-59, मॉर्ने मॉर्केल 2-82) दक्षिण आफ्रिका 7 षटकांत 2 बाद 24 (रबाडा खेळत आहे 8, हशिम आमला खेळत आहे 0, ग्रॅंडहोम 1-2, साऊदी 1-18)

Web Title: newzeland south africa test cricket match