स्मिथ व कोहली यांच्यावर कारवाई नाही- आयसीसी

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन म्हणाले, ""आम्ही फक्त एका संघर्षपूर्ण सामन्याचे साक्षीदार राहिलो. या सामन्यात दोन्ही संघांतील खेळाडूंनी सर्वस्व पणाला लावले.

नवी दिल्ली - डीआरएस'च्या वापरासंदर्भात ड्रेसिंगरुमकडे इशारा करण्याच्या ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या कृतीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पूर्णपणे कानाडोळा केल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.

दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली होती. मात्र, याच सामन्यात पंचांनी बाद दिल्यावर "डीआरएस' घेण्यासंदर्भात स्मिथने ड्रेसिंगरुममध्ये इशारा करून विचारणा केली होती. क्रिकेटच्या "डीआरएस'च्या नियमात स्मिथची ही कृती न बसणारी होती. त्यामुळे भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) स्मिथवर कारवाई करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. भारतीय कर्णधार विराट कोहलीनेदेखील स्मिथने ही कृती सामन्यात एकदा नव्हे, तर दोन तीनवेळा केल्याचे जाहीरपणे सांगितले होते.

मात्र, आयसीसीने आज रात्री उशिरा प्रसिद्धिपत्रकाद्वारे कुठल्याही खेळाडूविरुद्ध आचारसंहितेचा भंग झाल्याचे आरोप करण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे स्मिथ किंवा कोहली यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्‍नच येत नाही, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन म्हणाले, ""आम्ही फक्त एका संघर्षपूर्ण सामन्याचे साक्षीदार राहिलो. या सामन्यात दोन्ही संघांतील खेळाडूंनी सर्वस्व पणाला लावले. अशा संघर्षपूर्ण सामन्यात खेळाडूंच्या भावना केवळ प्रखरपणे व्यक्त झाल्या.'' यानंतर आता आयसीसी निरीक्षक ख्रिस ब्रॉड तिसऱ्या कसोटीपूर्वी दोन्ही कर्णधारांना एकत्र बोलावून त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतील, असेही रिचर्डसन यांनी सांगितले.

Web Title: No action against Kohli and Smith on DRS row: ICC