तंदुरुस्तीचा "विराट' पेच 

वृत्तसंस्था
Friday, 25 May 2018

"विराट लोड' 
- गेल्या वर्षभरात विराटचा नऊ कसोटींमध्ये सहभाग 
- संघाच्या 32 पैकी 29 वन-डेमध्ये सहभागी 
- 18 पैकी नऊ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत सहभागी 
- विराटचे एकूण सामने 47 
- केवळ रोहित शर्मा, हार्दिक पंड्या यांचे प्रत्येकी 48 सामने 
- आयपीएलमधील 14 लढती धरून विराटचे सामने 61 

 

नवी दिल्ली - भारतीय कर्णधार विराट कोहली याचा कौंटी क्रिकेटमधील बहुचर्चित सहभाग अखेर बारगळला आहे. मानदुखीमुळे त्याला तीन आठवडे ब्रेक घ्यावा लागेल. त्यामुळे तो सरेकडून खेळू शकणार नाही. वैद्यकीय पुनर्वसनानंतर (रिहॅब) त्याची 15 जून रोजी बंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीत तंदुरुस्ती चाचणी होईल. 

पाठीचा मणका दुखावल्यामुळे विराटच्या कौंटीतील सहभागाविषयी प्रश्‍नचिन्ह असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने गुरुवारी दिले होते. त्यानंतर "बीसीसीआय' हंगामी मानद सचिव अमिताभ चौधरी यांनी खुलासा जारी केला. त्यानुसार 17 मे रोजी आयपीएलमध्ये हैदराबादविरुद्ध बंगळूरला झालेल्या लढतीत क्षेत्ररक्षणाच्या वेळी विराटची मान दुखावली. त्यानंतर वैद्यकीय पथकाने चाचण्यांच्या आधारे तपासणी केली. याशिवाय मुंबईतील एका तज्ज्ञाचा सल्लाही घेण्यात आला. विराटला विश्रांती घ्यावी लागेल आणि "रिहॅब' करून घ्यावे लागेल. तो "एनसीए'मध्ये सराव करेल.' 

तंदुरुस्तीचा विश्‍वास 
विराटने इंग्लंड दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी कौंटीत खेळायचे ठरविले होते. त्यासाठी त्याने अफगाणिस्तानविरुद्धची ऐतिहासिक कसोटी आणि आयर्लंड दौऱ्यातील टी-20 सामन्यांतून माघार घेतली होती. त्यावरून थोडा वाद निर्माण झाला होता. या पार्श्‍वभूमीवर विराट आयर्लंड, इंग्लंड दौऱ्यासाठी तंदुरुस्त होईल, असा विश्‍वास वैद्यकीय पथकाला वाटत असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे. आयर्लंड दौऱ्यातील टी-20 सामने जूनच्या अखेरच्या आठवड्यात होतील. त्यानंतर जुलैच्या प्रारंभी इंग्लंड दौऱ्याचा प्रारंभ टी-20 लढतींनी होईल. पहिली कसोटी एक ऑगस्टपासून सुरू होईल. 

"विराट लोड' 
- गेल्या वर्षभरात विराटचा नऊ कसोटींमध्ये सहभाग 
- संघाच्या 32 पैकी 29 वन-डेमध्ये सहभागी 
- 18 पैकी नऊ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत सहभागी 
- विराटचे एकूण सामने 47 
- केवळ रोहित शर्मा, हार्दिक पंड्या यांचे प्रत्येकी 48 सामने 
- आयपीएलमधील 14 लढती धरून विराटचे सामने 61 

इंग्लंडमधील अपयश 
विराटला 2014 च्या इंग्लंड दौऱ्यात अपयश आले. दहा डावांत 13.40 च्या सरासरीने तो केवळ 134 धावा करू शकला. यात दोन वेळा तो शून्यावर बाद झाला. केवळ चार वेळा तो "डबल फिगर'मध्ये जाऊ शकला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No slipped disc injury but Virat Kohli's County stint to be curtailed