प्रतिकार न करता हार स्वीकारणे वेदनादायी

वृत्तसंस्था
Tuesday, 14 August 2018

विराट आणि कंपनीवर माजी खेळाडूंचे फटकारे 
नवी दिल्ली, ता. 13 (पीटीआय) ः इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत प्रतिकारही न करता शरणागती स्वीकारणाऱ्या विराट कोहली आणि कंपनीवर माजी खेळाडूंनी टीकेचे आसूड ओढले आहेत, पण त्याच वेळी या संघात उसळी घेण्याची क्षमता असल्याचाही विश्‍वास व्यक्त केला. 

विराट आणि कंपनीवर माजी खेळाडूंचे फटकारे 
नवी दिल्ली, ता. 13 (पीटीआय) ः इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत प्रतिकारही न करता शरणागती स्वीकारणाऱ्या विराट कोहली आणि कंपनीवर माजी खेळाडूंनी टीकेचे आसूड ओढले आहेत, पण त्याच वेळी या संघात उसळी घेण्याची क्षमता असल्याचाही विश्‍वास व्यक्त केला. 
लॉर्डसवरील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला डावाने पराभव स्वीकारावा लागला, त्यानंतर वीरेंद्र सेहवाग, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि बिशनसिंग बेदी या माजी खेळाडूंनी जोरदार टीकास्त्र सोडले. भारतीय संघाकडून अतिशय खराब खेळ झाला. अपयशी कामगिरी होत असली, तरी भारतीय संघासोबत आपण राहायला हवे, परंतु प्रतिकार न करताही हार स्वीकारणे हे पाहणे वेदनादायी आहे. आत्मविश्‍वास आणि मानसिकता कणखर करून ते चांगले पुनरागमन करतील, असे ट्‌विट वीरेंद्र सेहवागने केले आहे. 

नेहमीच कठोर शब्दांत बोलणाऱ्या बेदी यांनी तर जहरी टीका केली. लॉर्डसवर भारतीय भयाण झाले होते. देशातील जवळपास प्रत्येक जण क्रिकेटशी जोडलेला आहे. या प्रत्येकाला भारतीय संघ कोठे चुकतो आहे, हे माहीत आहे; परंतु संघातून कोणाकडूनही धैर्य आणि जिद्द वाढवण्याचा विश्‍वास व्यक्त केला जात नाही, हे फलंदाजीतील हाराकिरीपेक्षा अधिक चिंताजनक आहे, असे बेदी यांनी म्हटले आहे. 

चुकांपासून बोध घेतला जाईल आणि तिसऱ्या कसोटीपासून खेळात सुधारणा होईल, असा विश्‍वास व्यक्त करून लक्ष्मण यांनी म्हटले आहे. प्रतिकूल वातावरणाच्या मगरमिठीत भारतीय संघ सापडला आहे. प्रतिस्पर्ध्यांचे डावपेच समजण्याअगोदर लॉर्डस कसोटीत प्रतिकार न करता पराभूत झाला. या चुकांतून लगेचच बोध घेतला जाईल आणि फलंदाज अधिक सक्षमपणे प्रतिकार करतील, अशी आशा आहे. 

दोन डावांत केवळ 82 षटके फलंदाजी 
लॉर्डस कसोटीतील भारतीयांची फलंदाजी पाहणे वेदनादायी होते. दोन डावांत आपला संघ केवळ 82 षटकेच फलंदाजी करू शकला. चुकांमधून हे फलंदाज सुधारले नाहीत. एकाही फलंदाजामध्ये आत्मविश्‍वास दिसून येत नाही, अशी टीका महंमद कैफने केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old cricketers criticise on indian test cricket team