esakal | द्रविडकडून शिकण्याची संधी जास्त मोलाची : सिद्धेश 
sakal

बोलून बातमी शोधा

Opportunity to learn from Dravid: Siddesh

द्रविडकडून शिकण्याची संधी जास्त मोलाची : सिद्धेश 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : भारत 'अ' संघातून खेळण्याची संधी मिळाल्यामुळे राहुल द्रविड यांच्याकडून खूप काही शिकता येईल. हे जास्तीत जास्त साध्य करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे सिद्धेश लाडने सांगितले. सिद्धेशची ऑस्ट्रेलिया, तसेच दक्षिण आफ्रिकेच्या 'अ' संघांचा सहभाग असलेल्या चौरंगी स्पर्धेतील भारत 'अ' संघात निवड झाली आहे. 

भारत, दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाच्या 'अ' संघाबरोबरच भारत 'ब' संघाचा सहभाग चौरंगी स्पर्धेत असेल. ही स्पर्धा विजयवाड्यात 17 ते 29 ऑगस्टदरम्यान होणार आहे. सिद्धेशने 39 प्रथम श्रेणी लढतीत 2 हजार 767 धावा केल्या आहेत; पण त्याची प्रथमच भारतीय 'अ' संघात निवड झाली आहे. त्याच्याच बरोबर मुंबईचा भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादव याचीही निवड झाली आहे. 

देशांतर्गत स्पर्धेत सातत्याने धावा केल्यामुळेच मला ही संधी मिळाली आहे. तिचा पुरेपूर फायदा करून घेणार आहे. अर्थात, या संघात असताना राहुल द्रविड यांच्या सूचना मोलाच्या ठरतील, असेही लाडने सांगितले. 
 
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात केल्याचा मला खूपच फायदा झाला आहे. यापूर्वी मी प्रामुख्याने चार दिवसीय लढती खेळलो होतो; तसेच मधल्या फळीत फलंदाजी केली होती. त्यामुळे आयपीएलचा अनुभव खूपच मोलाचा ठरेल. देशाकडून खेळणे हेच लक्ष्य आहे; पण त्याचा फारसा विचार करून काही साध्य होत नाही. 
- सूर्यकुमार यादव

loading image