दोन वर्षातील सर्वांत वाईट कामगिरी: कोहली

वृत्तसंस्था
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

या सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीचा लाभ ऑस्ट्रेलियासच अधिक चांगल्या पद्धतीने करुन घेता आला. त्यांनी पूर्ण सामनाभर आम्हाला दबावाखाली ठेवण्यात यश मिळविले. त्यांच्या या उत्तम खेळाचे सर्व श्रेय सर्वस्वी त्यांनाच आहे

पुणे - ऑस्ट्रेलियाकडून अवघ्या तीन दिवसांत 333 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना भारतीय कर्णधार विराट कोहली याने या सामन्यातील कामगिरी ही भारतीय फलंदाजांची गेल्या दोन वर्षातील सर्वांत वाईट कामगिरी होती, असे मत व्यक्त केले.

"या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आम्हाला पूर्णत: पराजित केल्याचे मान्य करावयासच हवे. या तीन दिवसांत आम्ही चांगली कामगिरी करु शकलो नाही. या सामन्यात झालेल्या चुकांकडे लक्ष द्यावे लागेल. या सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीचा लाभ ऑस्ट्रेलियासच अधिक चांगल्या पद्धतीने करुन घेता आला. त्यांनी पूर्ण सामनाभर आम्हाला दबावाखाली ठेवण्यात यश मिळविले. त्यांच्या या उत्तम खेळाचे सर्व श्रेय सर्वस्वी त्यांनाच आहे,'' असे कोहली म्हणाला.

या सामन्यात नव्या जोमाने पुनरागमन करण्याचा आशावादही कोहली याने यावेळी व्यक्त केला. फिरकीचा सामना करण्यासाठी नाणावलेली भारतीय फलंदाजी या सामन्यातील पहिल्या डावांत 105 धावांत; तर दुसऱ्या डावांत 107 धावांत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ओ कीफ व अन्य ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर पहिल्या डावांत अवघी 40 षटके तग धरलेली भारतीय फलंदाजी दुसऱ्या डावांत उणेपुरे 34 षटकेही पूर्ण करु शकली नाही. ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेमधील हा पहिला सामना तब्बल 333 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Web Title: Our worst batting display in last two years, says Virat Kohli